अवचितवाडा-थिवी, बार्देश येथील ‘लाला की बस्ती’ मध्ये अतिक्रमण करत बांधलेली 25 बेकायदेशीर घरे काल पाडण्यात आली. जवळजवळ 20 वर्षांच्या सतत कायदेशीर संघर्षानंतर ही कारवाई करत कोमुनिदादने आपली जमीन परत मिळवली आहे.
सुरुवातीला 12 मार्च रोजी कोमुनिदादच्या जागेतील ही बेकायदा घरे पाडण्याचे नियोजन होते; परंतु शेवटच्या क्षणी ते पुढे ढकलण्यात आले. अखेर काल सकाळी पोलिस संरक्षणात आणि अतिक्रमणविरोधी पथकाच्या उपस्थितीत ही कारवाई शांततेत पार पडली. न्यायालयाच्या आदेशानुसार बार्देश तालुका उपजिल्हाधिकारी, मामलेदार, स्थानिक थिवी पंचायत अधिकारी, कोलवाळ पोलीस अधिकारी आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि फौजफाट्यासहित ही बेकायदा घरे पाडण्यात आली.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, उत्तर गोवा कोमुनिदादचे प्रशासक पांडुरंग गाड यांनी या अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावल्या होत्या आणि त्यांना स्वेच्छेने हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. दिलेल्या कालावधीत घरे रिकामी न केल्याने अधिकृत आदेशानुसार काल ही घरे पाडण्यात आली.
ही घरे कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय कोमुनिदादच्या जमिनीवर बांधण्यात आली होती. या वस्तीला ‘लाला की बस्ती’ म्हणून ओळखले जात असे. स्थलांतरितांनी काही वर्षांपूर्वी तेथे स्थायिक होऊन ही घरे बांधली होती. त्यावेळी त्यांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप होता आणि त्यांनी कोमुनिदाद जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केले होते.
हे अतिक्रमण थांबवण्यासाठी थिवी कोमुनिदादच्या व्यवस्थापन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कारवाईअंती ही जमीन आता कोमुनिदादला परत मिळाली आहे.