Home Featured दहा हजार सरकारी पदे लवकरच भरणार ः राणे

दहा हजार सरकारी पदे लवकरच भरणार ः राणे

0

आरोग्य खात्यात 5 हजार पदेे

सरकारी खात्यांत 10 हजारांवर पदे निर्माण होणार असून आपल्या आरोग्य खात्यातच किमान 5 हजार पदे भरली जाणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. काल कुंभारजुवे मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिवाडी बेटावर लवकरच एक सुसज्ज असे इस्पितळ उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात न्युरोलॉजी, कार्डियोलॉजी व अन्य काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे याची आपणाला जाणीव आहे. जोपर्यत तेथे या सुविधा निर्माण होत नाहीत तोपर्यंत दक्षिण गोव्याच्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीने न्याय दिला असे म्हणता येणार नसल्याचे राणे म्हणाले. गोमंतकीयांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोमेकॉत 350 कोटी रु. खर्च करून कर्करोग इस्पितळ उभारण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

दिवाडी बेटावर इस्पितळ
कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेल्या मागणीनुसार दिवाडी बेटावर 50 खाटांचे इस्पितळ उभारण्यात येईल. इस्पितळासाठीची जागा संपादित करण्यात आल्यानंतर विनाविलंब इस्पितळासाठीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. पुढील निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.