Home Featured तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलेच

तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलेच

0

>> मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटामध्ये सामील; अमेरिकेतून विशेष विमानाने आणल्यानंतर एनआयएकडून अटक

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या तहव्वूर राणाला (64) अमेरिकेतून विशेष विमानाने काल भारतात आणण्यात आले. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात आले. राणाला घेऊन आलेले अमेरिकन गल्फस्ट्रीम जी-550 हे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल विमानतळावर उतरले. तेथून राणाला थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेण्यात आले. राणाला मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी 2009 मध्ये अमेरिकेत अटक झाली होती. राणा हा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा सदस्य आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा राणा याची कोठडी मिळवण्यासाठी त्याला विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

तहव्वूर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. अखेर या प्रयत्नांना यश आले अन्‌‍ राणाला फरफटत भारतात आणण्यात आले. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केली. यानंतर त्याला एनआयए मुख्यालयात नेण्यात आले, तिथे त्याची चौकशी केली जाईल. तत्पूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर तहव्वूर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तेथे तुरुंग प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे.
केंद्र सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ही जबाबदारी तीन वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत देण्यात आली आहे.

तहव्वूर राणाने भारतात पाठवले जाऊ नये म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली. त्याच्या याचिकेत त्याने स्वतःला पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते आणि म्हटले होते की, जर त्याला भारतात पाठवले गेले तर त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात.
26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. हे हल्ले चार दिवस चालू राहिले होते. या हल्ल्यामध्ये एकूण 166 नागरिक ठार झाले होते आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते, तर अजमल कसाब ह्या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते.
कोण आहे तहव्वूर राणा?
1961 मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वूर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि नंतर 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेला. कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर, तो शिकागो येथे स्थायिक झाला. तिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय चालवत होता.

पीडितांना न्याय देण्यासाठी
आवश्यक पाऊल : अमेरिका
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण हे पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एक आवश्यक पाऊल आहे. राणाचे प्रत्यार्पण हे मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या 6 अमेरिकन नागरिकांना आणि इतर अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे.

मुंबई हल्ल्यातील सहभाग काय?
मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या मूळ पाकिस्तानी नागरिक तहव्वूर राणाने त्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कोलमन हेडली याला मुंबईत ‘फर्स्ट वर्ल्ड’ नावाचे कार्यालय उघडण्यास मदत केली होती. डेविडने आपल्या दहशतवादी कारवाया लपवण्यासाठी हे कार्यालय उघडले होते. यानंतर लष्कर ए तोयबाला दहशतवादी हल्ले करता येतील, अशा ठिकाणांचा शोध घेण्यास त्याने सुरुवात केली होती. याशिवाय भारतात भेट देण्यासाठी व्हिसा कसा मिळवायचा याबद्दल राणानेच हेडलीला सल्ला दिला होता. या सर्व गोष्टी ईमेल व इतर कागदपत्रांद्वारे सिद्ध झाल्या आहेत. मुंबई हल्ल्याच्या 405 पानी आरोपपत्रात राणाच्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेख आहे.

पाकिस्तानने हात झटकले
तहव्वूर राणा भारतात आणण्यात आल्यानतंर पाकिस्तानने मात्र तहव्वूर राणापासून हात झटकले आहेत. राणा हा कॅनडाचा नागरिक आहे, त्याचा पाकिस्तानशी आता संबंध नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. राणाने गेल्या दोन दशकांपासून त्याच्या पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण केले नसल्याचा दावाही पाकिस्तानने केला.