Home Featured हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

0

मोर्ले-दोडामार्ग येथील घटना; ग्रामस्थांचा वनविभागाविरोधात संताप

दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव चांगलाच वाढला असून, मंगळवारी सकाळी आपल्या काजू बागेत काम करणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. लक्ष्मण यशवंत गवस असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. फणस खात असलेल्या हत्तीने हल्ला चढवून स़ोंडेत पकडून आपटले आणि नंतर पायाने तुडवले, त्यात लक्ष्मण गवस यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हत्ती पकड मोहीम राबवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत 8 तास मृतदेह हलवू दिला नाही. आठ तासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात हलविला; पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावाबाहेर जाऊ दिले नाही.

गेल्या काही दिवसापासून मोर्ले गावात ओंकार नामक हत्ती फिरत आहे. लक्ष्मण यशवंत गवस हे मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे काजू बागेत फेरफटका मारण्यासाठी जात होते. यावेळी पायवाटेच्या वरच्या बाजूला ओंकार नामक हत्ती फणस खात होता. लक्ष्मण गवस हे त्याच्या नजरेस पडताच त्याने पाठलाग करत त्यांना बांबू बेटातून पुढे फेकून दिले. सोंडेने हात मोडला आणि नंतर त्यांच्यावर पाय ठेवला. त्यामुळे गवस यांचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर सकाळी सात वाजता काजू बागेत गेलेले लक्ष्मण यशवंत गवस हे घरी न परतल्याने त्यांचा भाऊ बघायला गेला असता हत्तीच्या पाऊल खुणा आणि लक्ष्मण गवस पडलेल्या स्थितीत आढळून आले. यानंतर मोर्ले गावातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. तसेच दोडामार्ग वन अधिकारी, दोडामार्ग पोलीस, तहसीलदारांना घटनेची माहिती दिली. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे संतप्त ग्रामस्थांनी अधिकारी यांना धारेवर धरले.

हल्ल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना गावात रोखून धरले होते. जोपर्यंत हत्ती पकड मोहिमेचा आदेश आणि तातडीने नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर रात्री उशिरा राज्य सरकार व नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांकडून मोर्ले गावातील ओंकार टस्कर हत्तीला तात्काळ जेरबंद करण्यासाठी आदेश जारी केला. हा आदेश मिळाल्यानंतर दहा तासांनी आंदोलन मागे घेऊन साडेसात वाजता सर्वांची सुटका केली.