पाकमधील रेल्वे अपहरण नाट्य संपुष्टात

0
4

बीएलएच्या तावडीतून सर्व ओलिसांची सुटका केल्याचा पाक लष्कराचा दावा

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) तावडीतून सगळ्या ओलिसांची सुटका करण्यात आली असून, बचाव मोहीम पूर्ण झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. बुधवारी रात्रीच रेल्वे अपहरण नाट्य संपल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला. बचाव मोहिमेदरम्यान 346 प्रवाशांची सुटका केल्याचा दावा पाक लष्कराने केला आहे. या कारवाईत 33 बलुच बंडखोर मारले गेले आहेत, तसेच या कारवाईत काही ओलिसांचाही मृत्यू झाल्याचे पाक लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, आताही आमच्या ताब्यात 150 पेक्षा अधिक जण असल्याचा दावा बीएलएने छातीठोकपणे केला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या बचाव मोहिमेनंतर बोलानच्या डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणात छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडले आहेत. त्यातील बहुतांश मृतदेह सैनिकांचे आहेत. हे सैनिक सुट्ट्यांवर होते. ते जाफर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. स्थानिक रहिवासी आणि सैन्यातील सुत्रांच्या माहितीनुसार, 100 पेक्षा अधिक मृतदेह बोलानच्या डोंगरांवर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा अद्यापही रहस्य बनून राहिला आहे.