गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने आणखी एका सायबर गुन्हा प्रकरणाचा छडा लावण्यास यश मिळविले आहे. जुने गोवेतील एका नागरिकाची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मुंबईतून एका व्यक्तीला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी रुतिक अनिल निकम (23, रा. महाराष्ट्र) याला अटक केली आहे.
या प्रकरणामध्ये संशयित आरोपीने जुने गोवेतील एका नागरिकाला एका ट्रेडिंग ॲपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या नागरिकाला आर-1 ग्रुप नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर एकूण 38 लाख रुपये 9 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास भाग पाडले.
या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर गुन्हा विभागाने केलेल्या आर्थिक तपासादरम्यान, एका लेयर वन खातेधारकाच्या (रुतिक अनिल निकम) बँक खात्यात उच्च परताव्याचे कारण दाखवून तक्रारदाराकडून 2 लाख रुपये जमा करण्यात आले होते.
सायबर गुन्हा विभागाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस तपासात असे दिसून आले की, हेच बँक खाते भारतातील इतर 22 सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींशी जोडलेले होते, ज्यांची एकूण रक्कम 11.5 कोटी रुपये होती.