राज्यातील सुमारे 130 कोटी रुपयांच्या आर्थिक गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील फरार मुख्य संशयित आरोपी मायरॉन रॉड्रिगीस याची दुसरी पत्नी दीपाली परब (42, रा. कल्याण मुंबई) हिच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांनी वाढ केली आहे. या आर्थिक गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी दीपाली परब हिला 4 मार्च रोजी अटक करून पोलिसांनी सात दिवसांची कोठडी घेतली होती. तो संपल्याने तिला काल मडगाव येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे करून आणखी 7 दिवसांनी पोलीस कोठडी वाढवून घेण्यात आली आहे. मायरॉन रॉड्रिगीस व इतरांच्या विरोधात आर्थिक फसवणूक प्रकरणात दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात मुंबईत सुध्दा एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याने विदेशात पलायन केले आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने त्याच्या दोन्ही पत्नींना या फसवणूक प्रकरणामध्ये अटक करून त्यांची चौकशी केली आहे.