‘आप’च्या 7 आमदारांनी सोडला पक्ष

0
4

दिल्ली विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 5 दिवस आधी आम आदमी पक्षाच्या 7 विद्यमान आमदारांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा काल राजीनामा दिला. यामध्ये मेहरौली, त्रिलोकपुरी, जनकपुरी, बिजवासन, पालम, आदर्श नगर, कस्तुरबा नगर विधानसभा जागांचा समावेश आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

पालम येथील आमदार भावना गौर यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे, त्यामध्ये त्यांनी आपण पक्षावरील विश्वास गमावल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तुरबा नगरचे आमदार मदन लाल आणि मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांनीही आम आदमी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा आणि बिजवासनचे आमदार बी. एस. जून यांनी देखील पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व आमदारांना आम आदमी पक्षाने 2025 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे.
आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या अधिकृत यादीनुसार पक्षाने आदर्श नगर येथून मुकेश गोयल यांना संधी दिली आहे. प्रविण कुमार यांना जनकपुरी, सुरेंद्र भारद्वाज यांना बिजनवास, जोगींदर सोलंकी यांना पालम, रमेश पेहलवान यांना कस्तुरबा नगर, नरेश यादव यांना मेहरौली आणि अनजना पर्चा यांना त्रिलोकपुरी येथून उमेदवारी देण्यात आले आहे.