सोमवारी सायंकाळपर्यंत ‘तिळारी’तून गोव्याला पाणीपुरवठा

0
3

डाव्या कालव्याच्या दुरुस्तीकाम पाहणीनंतर जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती

एक आठवडा उलटला तरी कुडासे-दोडामार्ग येथे भगदाड पडलेल्या तिळारी धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. काल सायंकाळी जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी मुख्य अभियंता प्रमोद बदामी व इतर अधिकाऱ्यांसमवेत कालव्याच्या दुरुस्तीकामाची पाहणी करून आढावा घेतला. कालव्याचे काम जोरात सुरू असून, शनिवार-रविवारपर्यंत अधिक जोमाने काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे साधारणपणे सोमवारी सायंकाळपर्यंत कालव्याची दुरुस्ती पूर्ण होऊन गोव्याला पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे जटील प्रश्न निर्माण झालेला असला तरी गोवा व महाराष्ट्राच्या सहकार्याने आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येत आहे. एका बाजूचे काम पूर्ण होत आले असून उर्वरित काम सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलसंपदा खाते अविरत कार्यरत आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत निश्चितपणे तिळारीचे पाणी गोव्यात दाखल होईल, असा विश्वास शिरोडकर यांनी व्यक्त केला.
गोव्याच्या सर्व भागांत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखत असून, साळ येथे बंधारा आणि पंपिंग स्टेशन, तसेच आमठाणे येथे नवीन जलकुंभ अशा अनेक योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा तुटवडा भासणार नाही, असे शिरोडकर म्हणाले.