Home Featured आयटीआयला दहावी-बारावी समकक्ष दर्जा देण्याचा विचार

आयटीआयला दहावी-बारावी समकक्ष दर्जा देण्याचा विचार

0

मुख्यमंत्री; 5 आयटीआय केंद्रांच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील (आयटीआय) अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीच्या समांतर दर्जाची शैक्षणिक पात्रता देण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे दिली. आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या राज्यातील पाच आयटीआय केंद्रांच्या आधुनिकीकरणाच्या पायाभरणी सोहळ्यात ते बोलत होते.

आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्याने एका वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याची शैक्षणिक पात्रता दहावीच्या समांतर दर्जाची समजण्यात येईल. तसेच, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याची शैक्षणिक पात्रता बारावीच्या समांतर दर्जाची समजण्यात येणार आहे. शिक्षण खात्याकडून याबाबत लवकरच आदेश जारी करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याची शैक्षणिक पात्रता ही बारावीच्या समान दर्जाची गृहित धरण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्याला सध्याच्या नियमाप्रमाणे शालांत मंडळाच्या दोन भाषा विषयांची परीक्षा द्यावी लागणार नाही. यासाठी अभ्यासक्रमात काही बदल करावा लागणार आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना बी.ए. किंवा बी.कॉम. साठी प्रवेश घेता येईल. पुढील वर्षापासून याबाबत अंमलबजावणी होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारने आयटीआयतून कौशल्य विकास उपक्रम सुरू केले आहेत. सर्व आयटीआयना आयएसओ मानांकन मिळाले आहे. डिचोली, फर्मागुडी, वास्को, काकोडा आणि म्हापसा येथील आयटीआय अद्ययावत करण्यात येणार आहेत. या आयटीआय केंद्राच्या आधुनिकीकरणामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. त्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीकडून 165 कोटी, तर गोवा सरकारकडून सुमारे 35 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, कौशल्य विकास खात्याचे संचालक एस. एस. गावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

सरकारी कार्यालयात एमटीएस पदासाठी दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. नवीन नियम आल्यावर दहावीत अनुत्तीर्ण पण आयटीआय झालेले विद्यार्थी देखील सरकारी खात्यात एमटीएस पदासाठी अर्ज करू शकतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.