‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणात आणखी 1 संशयित गजाआड

0
3

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने शिवोली-बार्देश येथील एका 68 वर्षीय ज्येष्ठ महिलेला डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, राहुल मिश्रा (रा. बिलासपूर, उत्तर प्रदेश) असे पाचव्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणाचा तपास करताना त्यात राहुल मिश्रा याचा सहभाग असल्याचे समोर आले. संशयित राहुल मिश्रा याला ताब्यात घेण्यासाठी उपनिरीक्षक नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक बिलासपूर उत्तर प्रदेश गेले होते. पोलीस पथकाने संशयित राहुल मिश्रा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याची दोन बँक खाती असल्याचे समोर आले. संशयित विविध राज्यांतील सात (वेगवेगळ्या) सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये गुंतल्याचे समोर आले आहे. त्याच्या बँक खात्यातून सुमारे 2 कोटी 58 लाख 31 हजार 997 रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्याच्याकडून 2 मोबाईल, एक लॅपटॉप, एक टॅब आणि दोन हार्डडिस्क जप्त करण्यात आले आहेत. अटकेनंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती. ही फसवणुकीची घटना 26 ते 28 डिसेंबर 2024 या काळात घडली होती. अज्ञात इसमाने व्हॉट्सॲप कॉल करून दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगून सदर महिलेची फसवणूक केली होती.