Home Featured जंटलमन

जंटलमन

0

राजकारणाच्या गलीच्छ क्षेत्रामधला एक सज्जन नेता आपल्यातून निघून गेला. कमी बोलणारे, उठसूट बौद्धिके न देणारे, परंतु देशासाठी मूलगामी काम करुन गेलेले पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मरण देश कायम ठेवील. आज आपला देश जो जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, त्या आर्थिक घोडदौडीचा पाया रचण्याचे खरे श्रेय मनमोहन सिंग यांनाच द्यावे लागेल. सिंग यांनी आधी नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून आणि नंतर आपल्या स्वतःच्या पंतप्रधानपदाच्या दोन कार्यकाळांत देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी आणि देशाच्या विदेश नीतीसंबंधी जे क्रांतिकारी निर्णय घेतले त्यांनी भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. भारताने पत्करलेली आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाबाबतची सकारात्मक व स्वागतशील भूमिका देशाची भूतकाळातील परमिट राजची जोखडे फेकून जागतिक वर्तमान परिस्थितीशी सांधा जुळवणारी ठरली. स्वतः अर्थतज्ज्ञ असल्याने सिंग यांना अर्थव्यवस्थेचे स्थैर्य किती महत्वाचे असते आणि तिला चालना कशी द्यायची असते याची जाणीव होती. आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने चाललेल्या आणि जेमतेम तीन ते चार टक्के विकासदर गाठू शकणाऱ्या देशाला त्यांच्या कालसुसंगत अर्थनीतीने सावरले. भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांनी जणू प्राण फुंकले. पुढे स्वतः सिंग यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे नेतृत्व आले तेव्हा देशाचा विकासदर आठ टक्क्‌‍यांवर जाऊ शकला. सरकार नियंत्रित सावध, बचावात्मक अर्थनीतीकडून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रे खुली करणाऱ्या आर्थिक उदारीकरणापर्यंत जी गगनझेप देशाने घेतली, त्याची फळे आज आपण चाखत आहोत. देशाच्या मध्यमवर्गाच्या हातात आज जर पैसा खुळखुळत असेल, तर त्याचे आणि त्या वर्गाच्या झालेल्या विस्ताराचे खरे श्रेय मनमोहन सिंग यांनाच जाते. भारताच्या आर्थिक धोरणांवर आधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नंतर नरसिंह राव सरकारचे अर्थमंत्री म्हणून आणि मग स्वतः पंतप्रधान म्हणून दीर्घकाळ मनमोहन सिंग यांचीच छाप राहिली आहे. जागतिकीकरणात पिछाडीवर राहिलेल्या भारताला प्रगत देशांच्या पंक्तीत त्यांनीच आणून बसवले.विशेषतः आपल्या सरकारच्या स्थैर्याची पर्वा न करता त्यांनी केलेला भारत – अमेरिका अणू करार नेहरूंच्या काळापासून चालत आलेली भारताची अलिप्ततावादी सावध नीती संपुष्टात आणणारा आणि जागतिक राजकारणात भारताला महत्वाचे स्थान मिळवून देणारा ठरला. पोखरणच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने घातलेले निर्बंध तर त्या अणुकरारामुळे संपुष्टात आलेच, शिवाय भारत आणि अमेरिके दरम्यान नव्या मैत्रिपर्वाचा आरंभही त्यातून झाला, जो आज नरेंद्र मोदी सरकारने अधिक दृढमूल केलेला आहे. मात्र ह्या अणुकराराने सिंग यांचे सरकार गडगडण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु देशहितापुढे सिंग यांनी डाव्या पक्षांच्या विरोधाची पर्वा केली नाही. विश्वासदर्शक ठरावात सिंग यांचे सरकार 275 – 256 अशा किरकोळ फरकाने तेव्हा तरले. परंतु एक जबाबदार अणुशक्ती म्हणून भारताचे स्थान त्यांनी निर्माण केले. सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मनरेगासारखी ग्रामीण बेरोजगारीच्या उच्चाटनात मोलाचा वाटा उचलणारी योजना आली. सरकारमध्ये प्रशासकीय पारदर्शकता आणणारा माहिती अधिकार कायदा आला. गोरगरीबांना रोजचे दोन घास देण्याची हमी देणारा अन्न सुरक्षा कायदाही त्यांच्याच काळात आला. त्यांच्या पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ज्या अपेक्षा जागल्या होत्या त्या दुर्दैवाने दुसऱ्या कार्यकालात आघाड्यांच्या राजकारणात सामोरे जाव्या लागणाऱ्या मर्यादांमुळे पार कोलमडल्या. त्यातच टूजी, सीडब्ल्यूजी आणि कोळसा घोटाळ्यांच्या आरोपांमुळे त्यांच्या सरकारची प्रतिमा पार काळवंडली. पॉलिसी पॅरालिसीसचा आरोप त्यांच्या सरकारवर झाला. त्यातच सरकार आणि पक्ष अशी दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाली आणि पावलोपावली सिंग यांना अवमानित करण्याचे सत्र काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडून सुरु झाले. राहुल गांधीनी तर सिंग सरकारने काढलेला अध्यादेश भर पत्रकार परिषदेत टराटरा फाडला. सिंग यांनी स्वीकारलेले मौन त्यांच्या शालीनतेला साजेसे जरी असले तरी ते त्यांच्या नेतृत्वाला कमकुवत ठरवणारे ठरले. 2004 च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या जागांमध्ये 2009 च्या निवडणुकीत 61 जागांची भर पडली होती, परंतु सिंग यांच्या दुसऱ्या कारकिर्दीनंतर काँग्रेसची सत्ता गेली ती गेलीच. त्यांच्या सरकारवर लाखो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले परंतु व्यक्तिशः सिंग यांच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याची कोणाची हिंमत झाली नाही. त्यांचे प्रशासन जवळून पाहिलेल्या संजय बारू यांनी द क्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या नावाने त्यांच्यावर पुस्तक लिहिले. सिंग हे नेहमीच जंटलमन राहिले. ना त्यांनी कशाचा प्रतिवाद केला, ना स्वतःची बाजू मांडण्याची धडपड केली. पत्रकार परिषदेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर मात्र माध्यमे आणि विरोधकांपेक्षा इतिहास आपल्या कामगिरीचे अधिक दयाळूपणे मोजमाप करील अशी भावना त्यांनी विनम्रतेने व्यक्त केली होती. आज ते आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्याविषयी जे भरभरून बोलले जाते आहे ते ह्याचीच साक्ष देत नाही काय?