संसदेच्या अधिवेशनात राज्यघटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे गृहमंत्री शहा यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष येत्या 26 जानेवारीपर्यंत शहा यांच्या राजीनाम्यासाठी देशभर प्रचार मोहीम राबवणार आहे. या संदर्भात काँग्रेस नेते 150 हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून 27 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावी येथे पक्षाचा मोठा मेळावा होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी काल रविवारी सांगितले. वेणुगोपाल यांनी, संसदेच्या अधिवेशनात राज्यघटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचा अपमान केला आहे. शहा यांच्या वक्तव्यामुळे सर्वजण दुखावले आहेत. आजपर्यंत अमित शहा किंवा पंतप्रधानांनी माफी मागितलेली नाही. काँग्रेस हा मुद्दा 26 जानेवारीपर्यंत देशभरात मांडणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपचीही तयारी सुरू
काँग्रेसची तयारी पाहून भाजपनेही विरोधकांना उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाने आपल्या एससी/एसटी आघाडीला विधानसभेच्या सर्व जागांवर काउंटर मोहीम आखण्यास सांगितले आहे.
उत्त प्रदेश भाजप एससी/एसटी मोर्चाचे अध्यक्ष रामचंद्र कन्नौजिया यांनी पक्ष तळागाळातील विरोधकांचा पर्दाफाश करण्यासाठी मोहीम सुरू करेल. पक्ष दलितविरोधी घोषणा आणि विरोधी पक्षांच्या आधीच्या सरकारांनी उचललेली पावले असे मुद्दे उचलणार असल्याचे स्पष्ट केले.
शहा यांचे स्पष्टीकरण
गृहमंत्री शहा यांनी, डॉ. आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. संसदेतील चर्चा तथ्य आणि सत्यावर आधारित असली पाहिजे. भाजपच्या सदस्यांनीही तेच केले. काँग्रेस आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी, संविधानविरोधी आहे, हे सिद्ध झाल्यावर काँग्रेसने जुनीच रणनीती अवलंबून विधानांचा विपर्यास सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला.