अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार

0
4

>> राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांचा पराभव

>> रिपब्लिकनपक्षाला 277 जागांसह स्पष्ट बहुमत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यानंतर 2020 च्या निवडणुकीत ते जो बायडेन यांच्याकडून पराभूत झाले होते. काल त्यांनी कमला हॅरिस यांचा मतमोजणीत पराभव केला. डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेचे 47 वे राष्ट्रपती म्हणून जानेवारी महिन्यात शपथ घेतील.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली. बुधवारी पहाटे मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 1 च्या सुमारास निकाल स्पष्ट झाले. रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेत बहुमत मिळाले असून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा निवडणूक जिंकणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. 132 वर्षांपूर्वी, ग्रोव्हर क्लीव्हलँड दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. 1884 आणि 1892 च्या अध्यक्षीय निवडणुका त्यांनी 4 वर्षांच्या अंतराने जिंकल्या. कमला हॅरिस या निवडणुकीत विजयी झाल्या असत्या तर त्यांनी पहिल्या महिला राष्ट्रपती बनून इतिहास रचला असता. त्या सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत.

रिपब्लिकन पक्षाला 277 जागा
अमेरिकेतील 538 जागांपैकी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला आतापर्यंत 277 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 270 जागांची आवश्यकता होती. त्याचबरोबर कमला हॅरिस यांच्या पक्षाने 224 जागा जिंकल्या आहेत. मात्र, उर्वरित सर्व 5 राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच मुसंडी मारत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याविरोधात विजयी आघाडी घेतली. दोघांमध्ये केवळ 43 जागांचा फरक आहे. मात्र, उर्वरित सर्व 5 राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत चुरशीची लढत देऊनही कमला यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसोबतच अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, सिनेट आणि प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकाही झाल्या. रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाले असून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आघाडीवर आहे.

स्विंग स्टेटमध्ये हॅरिस मागे
कमला हॅरिस यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला, याचे एकमेव कारण म्हणजे स्विंग स्टेट्स. कमला यांना यापैकी एकातही आघाडी मिळाली नाही. 7 स्विंग राज्यांपैकी ट्रम्प यांनी 3 जिंकले आहेत आणि 4 मध्ये ते आघाडीवर होते. गेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी फक्त एक स्विंग स्टेट, नॉर्थ कॅरोलिना जिंकले. या राज्यांमध्ये 93 जागा आहेत. ट्रम्प यांना 93 पैकी 51 जागा मिळाल्या आहेत.

सहा भारतीय विजयी
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला असून अमेरिकेने सहा भारतीयांनाही स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून संधी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे श्री. ठाणेदार हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

अमेरिकेला महान बनवणार ः ट्रम्प
विजयानंतर अमेरिकन जनतेला संबोधित करताना ट्रम्प यांनी, मी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवणार आहे. या दिवसासाठी देवाने माझा जीव वाचवला होता. आता आपण आपला देश कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतो. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचे भविष्य आणखी विशाल, आणखी चांगले, आणखी श्रीमंत आणि आणखी सामर्थशाली असेल. देव तुम्हा सर्वांवर कृपा करो असे सांगितले.

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.