एन. बीरेन सिंह यांना मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवा

0
2

>> मणिपूरमधील भाजपच्या 19 आमदारांचीच मागणी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पत्र; मुख्यमंत्र्यांना हटवणे हाच हिंसाचार रोखण्याचा एकमेव मार्ग

17 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमधील भाजपच्या 19 आमदारांनी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मागणी थेट पंतप्रधानांकडे केली आहे. 15 ऑक्टोबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर भाजपच्या आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हिंसाचार थांबवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. केवळ सुरक्षा दलांच्या तैनातीने काहीही होणार नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.

मणिपूरमधील हिंसाचार दीर्घकाळ सुरू राहिल्यास एक राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमाही डागाळली जाईल, अशी भीती देखील या आमदारांनी व्यक्त केली आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष थोकचोम सत्यब्रत सिंह, मंत्री थोंगम विश्वजित सिंह आणि युमनम खेमचंद सिंह यांचाही समावेश आहे.
पत्रात आमदारांनी म्हटले आहे की, मणिपूरमधील लोक आता भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. लोकांना राज्यात शांतता आणि सामान्यता हवी आहे. लोक आता आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. हिंसाचारावर लवकर तोडगा न निघाल्यास दबाव वाढेल.

15 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निमंत्रणावरून मैतेई, कुकी आणि नागा समुदायातील 20 आमदार दिल्लीत पोहोचले होते. आधी त्यांची बैठक गृहमंत्रालयात होणार होती, मात्र नंतर ती आयबी कार्यालयात नेण्यात आली. आयबी ईशान्य सहसंचालक राजेश कांबळे, भाजप ईशान्य समन्वयक संबित पात्रा, केंद्राचे सुरक्षा सल्लागार ए. के. मिश्रा बैठकीला उपस्थित होते. प्रथम कुकी, नंतर मैतेई आणि त्यानंतर नागा नेत्यांशी चर्चा झाली. सर्वांनी आपल्या मागण्या केंद्रासमोर मांडल्या.

यानंतर सर्वांनी एका सभागृहात एकत्र येऊन शपथ घेतली की, या सभेनंतर मणिपूरमध्ये एकही गोळी चालवली जाणार नाही आणि कोणीही मृत्यूमुखी पडणार नाही. त्याला तिन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. यानंतर प्रतिनिधींनी एकमेकांशी हस्तांदोलन केले.
सुमारे दीड तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग उपस्थित नव्हते.
दरम्यान, मणिपूर विधानसभेत 60 आमदार आहेत. यामध्ये 10 नागा आणि 10 कुकी यांचा समावेश आहे. मंगळवारच्या बैठकीत 9 कुकी आमदार होते. यापैकी 4 जणांनी तीन मागण्या मांडल्या. मात्र, आता पुढे काय करायचे याचा निर्णय कुकी परिषद घेणार आहे.

कुकी प्रतिनिधींनी सरकारपुढे 3 मागण्या

पहिली मागणी : भारत सरकारने मणिपूरचे नेतृत्व बदलावे म्हणजेच मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हटवावे.
दुसरी मागणी : कुकी भागात स्वतंत्र प्रशासन असावे.
तिसरी मागणी : सशस्त्र गटांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करावे.