वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्योगविश्वातील ‘रत्न’ निखळले; दानशूर व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा उद्योग समूहा’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे काल निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी शोक व्यक्त केला आहे.
रतन टाटा यांना सोमवारी ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचे टाटांकडून सांगण्यात आले होते. काल संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरू होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी त्यांची प्रकृती नाजूक बनली. त्यानंतर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना टाटा उद्योग समूहाचे चेअरमनपद सोपवले. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. टाटांच्या मार्गदर्शनात 2008 मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मिस्त्रींकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेअरमनपदी ते आले. रतन टाटा यांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्सने एकाहून एक सरस कार बाजारात आणत दबदबा निर्माण केला. शिवाय इलेक्ट्रिक कारही बाजारात आणल्या, त्यालाही ग्राहकांची पसंती मिळाली. याशिवाय केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली आणि तोट्यात गेलेली एअर इंडिया विमानसेवेचा त्यांनी आपल्या साम्राज्यात पुन्हा ताब्यात घेतली. परदेशी कंपनी फोर्डने लँड रोव्हर आणि जग्वार या लक्झरी कार ब्रँडचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश केला.
नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेअरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत, तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही तीन मुले आहेत.
टाटा समूहाला नव्या उंचीवर नेले
रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी 2012 पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. 1996 मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बाजारात ‘लिस्टेड’ झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.
पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान
रतन टाटा यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
श्री रतन टाटा जी हे एक दूरदर्शी उद्योजक, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्यांची नम्रता, दयाळूपणा आणि समाजात सुधारणा करण्याची अटळ बांधिलकी यामुळे ते अनेकांना प्रिय झाले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.