मत्स्यविक्रीसाठी पर्यावरणपूरक फिरते वाहन उपलब्ध होणार

0
6

>> मच्छीमार खात्याकडून अधिसूचना जारी

राज्य सरकारच्या मच्छीमारी खात्याने पर्यावरणपूरक तीन चाकी फिरत्या मत्स्यविक्री वाहन योजनेची अधिसूचना जारी केली आहे.
मच्छिमारी खात्याकडून या योजनेखाली राज्यभरात मासळी विक्रीसाठी तीन चाकी वाहन उपलब्ध केले जाणार आहे. या पर्यावरणपूरक तीन चाकी वाहनात सोलर पॅनल, स्पिकर्स, रेफ्रिजरेशन, जीपीएस व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना माफक दरात स्वच्छ मासळी उपलब्ध करणे, तसेच, रोजगार उपलब्ध करण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मच्छीमारी खात्याचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. किंवा मच्छीमारी खात्यामध्ये सागर मित्र म्हणून काम केलेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. राज्यातील मच्छीमार, युवा मच्छीमार हे सुध्दा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीला 1 लाख रुपयांची हमी द्यावी लागणार आहे. या मत्स्य वाहिनी योजनेसाठी विविध अटीचे पालन लाभार्थीला करावे लागणार असून लाभार्थीला सामंजस्य करार करावा लागणार आहे. मत्स्य वाहिनी योजनेच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्याची 1 लाख रुपयांची हमी जप्त केली जाणार आहे.