डोंगरकापणी, भूरुपांतराविरोधात चतुर्थीनंतर आंदोलन

0
9

>> गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडून स्पष्ट; राज्यभरात भूरुपांतराचे सत्र

भाजप सरकारने राज्यभर डोंगरकापणी व भूरुपांतराचे सत्र सुरू केले असून, त्याविरुद्ध गणेशचतुर्थीनंतर काँग्रेस पक्ष आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
पेडणे, मांद्रे, धारगळ, कुठ्ठाळी, तिसवाडीतील रेईश मागूश, धारबांदोडा आदी ठिकाणी डोंगरकापणी करून भूरुपांतर करण्याचे काम चालू असल्याचे पाटकर म्हणाले. ही भूरुपांतरे करून गोव्यातील जमिनी दिल्लीतील बिल्डर लॉबीच्या घशात घातल्या जात असून, गोवा सरकार रिअल इस्टेट दलाल बनले असल्याचा आरोप पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

डोंगरकापणी करणाऱ्यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले होते; मात्र सध्यातरी राज्यात डोंगरकापणीचे सत्र चालू असून, कुणालाही सरकारने दंड ठोठावला नसल्याचे पाटकर म्हणाले.
स्थानिक लोकांचा विरोध असताना कुठ्ठाळी येथे भूतानी यांच्या प्रकल्पासाठी डोंगरकापणी चालू आहे. साळगाव मतदारसंघातील रेईश मागूश येथे डोंगरकापणी चालू आहे. त्याशिवाय धारगळ, मांद्रे, धारबांदोडा येथेही डोंगरकापणी चालू असून, शेती व बागायतींच्या जमिनीचे निवासी जमिनीत रुपांतर केले जात आहे. या जमिनी दिल्लीतील बिल्डर लॉबीच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. 2012 पूर्वी मनोहर पर्रीकर यांनी भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसांत राज्यात प्रादेशिक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता 12 वर्षांनंतरही भाजप सरकारने प्रादेशिक आराखडा तयार केलेला नाही, असेही पाटकर म्हणाले.

चोपडेत लाखो चौरस मीटर जमिनीचे रुपांतर
चोपडे येथे विभाग बदल करून 3 लाख 86 हजार चौरस मीटर एवढ्या जमिनीचे निवासी विभागात रुपांतर करण्यात आले आहे. तसेच ‘ईडन इन्व्हेस्टमेंट’ व ‘भ्रम ॲग्रो’ ह्या बाहेरच्या कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात भूरुपांतर झाले असल्याचा आरोपही अमित पाटकर यांनी केला. चतुर्थीनंतर काँग्रेस पक्ष याविरूद्ध आवाज उठवून लोकांमध्ये जागृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.