कल्याणकारी योजनांचे पैसे आज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा ः मुख्यमंत्री

0
9

गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा, नुकसानग्रस्त शेतकरी आणि दूध उत्पादक अशा सर्वांचे पैसे मंगळवार दि. 3 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यांमध्ये जमा होतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

राज्यात विविध सरकारी कल्याणकारी योजना सुरू असून, त्या योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. आता चतुर्थी सण जवळ आला असून, ते पैसे लवकरात लवकर जमा करावेत, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी सर्व योजनांचे पैसे मंगळवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील, असे स्पष्ट केले.

दरम्यान, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आणि गृहआधार योजना या योजनांच्या लाभार्थ्यांना, तसेच 2023 साली झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील पदक विजेते व स्वयंसेवकांना चतुर्थीपूर्वी त्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केली होती.
राज्य सरकारचे वेळकाढू धोरण व सुस्ती, तसेच आर्थिक दिवाळखोरी यामुळे विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्यात नेहमीच विलंब होत असतो, असा आरोप आलेमाव यांनी केला होता.