शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी मागितली माफी

0
8

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी काल महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मी शिवरायांच्या चरणावर डोके ठेवून माफी मागतो, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी शिवभक्तांची सुद्धा माफी मागितली. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नसलेल्यांपैकी मी नाही. माझे संस्कार वेगळे आहेत, असेही मोदी म्हणाले.

शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मोदींच्याच हस्ते गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आले होते. मात्र, हाच पुतळा कोसळल्याने राज्यात संताप असून, हा महाराजांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते या प्रकरणावर काय बोलणार त्याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, त्यांनी थेट माफीनामा देत वादावर पडदा टाकला.

मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तशी मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज त्यांच्या पायावर मस्तक ठेवून मी शिवाजी महाराजांची माफी मागतो, असेही मोदी म्हणाले.
आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते लोक नाही, जे या भूमीचे सुपूत्र वीर सावरकरांना अपमानित करतात, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात, असेही मोदी म्हणाले.