कळंगुट नायकावाडा येथील एका फ्लॅटमध्ये करासवाडा म्हापसा येथील वृद्ध महिला दिओदिता फर्नांडिस (64) यांचा गळा दाबून खून करून फरार झालेल्या आकिब ऊर्फ शौकत खल्पे (रत्नागिरी) व निखिल चंद्रकांत राजे (पुणे) या दोघांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेले दोघेही मालमत्ता खरेदी-विक्री व्यवसाय करतात.दिओदिता फर्नांडिस यांना ह्या नायकावाडो कळंगुट येथील बेन्सन नावाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करायची होती. त्यासाठी त्यांची या संशयितांसोबत चर्चा सुरू होती. पण त्यांच्यात कमिशनवरून वाद सुरू होता. दिओदिता ह्या त्या फ्लॅटमध्ये सुरू असलेले काम पाहण्यासाठी आल्या होत्या. पण रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तसेच त्यांचा फोनही आला नसल्याने त्यांच्या बहिणीने फ्लॅटच्या केअरटेकरला याची माहिती दिली. संध्याकाळी उशिरा दिओदिता यांची बहीण फ्लॅटकडे आल्यावर फ्लॅटचा दरवाजा बंद असल्याचे तिला आढळले.
बहिणीने डुप्लिकेट चावीद्वारे फ्लॅट उघडला तेव्हा डायनिंग हॉलमध्ये दिओदिता मृतावस्थेत आढळून आल्या. दिओदिता यांची पर्स आणि मोबाईल गायब होता. याची माहिती मिळताच कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक परेश सिनारी, किरण नाईक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृताचा मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉत पाठवला. शवचिकित्सा अहवालात त्यांचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे.
कळंगुट पोलिसांना संशयित आरोपी हे महाराष्ट्रात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी आकिब ऊर्फ शौकत खल्पे व निखिल चंद्रकांत राजे हे दोघेही संशयित हणजूण पेट्रोल पंप येथून ताब्यात घेतले. म्हापसा न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.