मालपे पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री एका पीकअप रिक्षाची स्कूटरला धडक बसल्याने सुरेश स्वरमंडळ (52, कुडाळ) हे गंभीपरित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना प्रथम म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारांनंतर त्यांना गोवा वैद्यकीय इस्पितळ बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर माहितीनुसार एमएच 07 एजे 3847 या क्रमांकाची पीकअप रिक्षा म्हापशाहून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. या रिक्षाच्या पुढे एमएच 07 वाय 8424 ही स्कूटर जात होती.
मालपे येथे पोहोचल्यावर महामार्गावर असलेल्या दुभाजक तोडलेल्या छोट्याशा वाटेने जाण्यासाठी स्कूटरस्वाराने अचानक दुसऱ्या बाजूने स्कूटर वळविल्याने रिक्षाची धडक सदर स्कूटरला बसून स्कूटरचालक श्री. स्वरमंडळ हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना गोमेकॉमध्ये हलवण्यात आले आहे. पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला व याप्रकरणी तेच पुढील तपास करत आहेत.