41 ते 59 वयोगटातील कलाकारांसाठी यंदापासून ‘कलावृद्धी’ पुरस्कार देणार

0
3

>> मंत्री गोविंद गावडे यांची पत्रकार परिषदेत घोषणा

राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्यातर्फे राज्यातील 41 ते 59 वयोगटातील कलाकारांसाठी यावर्षीपासून कला वृद्धी पुरस्कार देण्यात येणार आहे. दरवर्षी दहा कलाकारांना प्रत्येकी 25 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

राज्यातील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कला गौरव, युवा सृजन असे विविध पुरस्कार दिले जातात. युवा सृजन पुरस्कारासाठी वयोगटाची मर्यादा 25 ते 40 वर्षे आहे. तर कला गौरव पुरस्कार 60 वर्षांवरील कलाकारांना दिला जातो. मात्र 41 ते 59 वयाच्या कलाकारांना कोणताच पुरस्कार दिला जात नसल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच कला वृद्धी पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

यंदाचे कला वृद्धी पुरस्कार अन्य पुरस्कारांसोबतच देण्यात येतील. कला वृद्धी पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे.
या पुरस्काराचे अर्ज कला आणि संस्कृती खात्याचे संचालनालय, सर्व रवींंद्र भवन आणि राजीव गांधी कला मंदिर येथे उपलब्ध असतील. विविध कलाक्षेत्रातील कलाकारांना अर्ज करण्याची मुभा आहे. अर्ज करणारा कलाकार मूळचा गोमंतकीय असणे आवश्यक आहे. ज्या कलाकारांना याआधी युवा सृजन पुरस्कार मिळाला आहे त्यांना कलावृद्धी पुरस्कारासाठी अर्ज करता येणार नाही.

निवड समितीतर्फे अर्जाची छाननी करून एकूण 10 जणांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. निवड समितीला वाटल्यास सुमोटो पद्धतीने देखील या पुरस्कारासाठी कलाकाराची निवड केली जाऊ शकते, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. राज्यातील लहान मुलांमधील कलागुण शोधण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. यावेळी खात्याचे संचालक सगुण वेळीप व इतरांची उपस्थिती होती.