भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे गोव्यात आगमन

0
7

>> मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाची होणार असलेली फेररचना तसेच येत्या शनिवारी 24 ऑगस्ट रोजी भाजपच्या चिंबल येथे होणार असलेल्या मुख्यालय इमारतीची पायाभरणी या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व पक्षाचे गोवा प्रभारी आशिष सूद यांचे काल बुधवारी गोव्यात आगमन झाले.

शनिवारी होणार असलेली भाजपच्या मुख्यालय इमारतीची पायाभरणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. त्या अनुषंगाने विनोद तावडे व आशिष सूद राज्यात दाखल झाले असल्याची चर्चा पक्षात असली तरी राज्य मंत्रिमंडळाची जी फेररचना करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी हे नेते आले असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

जे. पी. नड्डा हे शनिवारी गोव्यात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे त्यांच्याशी मंत्रिमंडळ फेररचनेबाबत अंतिम स्वरुपाची बोलणी करणार असून तत्पूर्वी ते याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व पक्षाचे गोवा प्रभारी आशिष सूद यांच्याशी चर्चा करणार असून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे हे वरील दोन्ही नेत्यांबरोबरच नड्डा यांच्यासमोर राज्यमंत्रिमंडळातील मंत्र्यांची कामगिरी व रिपोर्ट कार्ड ठेवणार आहेत. वादग्रस्त ठरलेल्या व मंत्री म्हणून चांगला प्रभाव न पाडू शकलेल्या अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डिच्चू देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत:च स्पष्ट केले होते. जे मंत्री चांगले काम करू शकलेले नाहीत त्यांना वगळण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्याचबरोबर मंत्रिमंडळ फेररचनेस थोडा विलंब लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

पक्षाच्या मुख्यालयाची शनिवारी पायाभरणी

येत्या शनिवारी चिंबल येथे पक्षाच्या मुख्यालयासाठीच्या इमारतीची पायाभरणी होणार असून त्यामुळे पक्षात त्यासाठीची धामधूम व लगबग आहे. राज्य मंत्रिमंडळाची फेररचना चतुर्थीनंतरच होणार असल्याचे यापूर्वी भाजप गोटातून सांगितले जायचे. मात्र, फेररचना चतुर्थीपूर्वी होऊ शकते, असे संकेत आता मिळू लागले आहेत. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री मोठे फेरबदल करू पाहत आहेत, अशी माहितीही काल एका दिग्गज नेत्याने दै. नवप्रभाशी बोलताना दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी जे आमदार व मंत्री पक्षासाठी चांगली कामगिरी करू शकले नव्हते त्यापैकी काही मंत्र्यांना मंत्रिपद गमवावे लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

तिघांची मंत्रिपदी वर्णी?

सभापती रमेश तवडकर यांच्यासह एकूण तीन नव्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सभापती रमेश तवडकर यांनी गेल्या मंगळवारी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना केंद्रीय नेतृत्वाने आपणाला मंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले होते.

मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत पक्षाला माहिती नाही ः तानावडे

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत पक्ष संघटनेला अजूनपर्यंत काहीच माहिती दिलेली नाही, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी भाजप मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काल दिली.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि गोवा प्रभारी आशिष सूद यांचे गोव्यात आगमन झाल्याने राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत पक्ष संघटनेला अजूनपर्यंत माहिती दिली नाही. मुख्यमंत्र्यांकडून माहिती मिळाल्यानंतर सर्वांना कळविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेनिमित्त आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि गोवा प्रभारी आशिष सूद यांचे गोव्यात आगमन झाले आहे, असेही प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सांगितले.

भाजपच्या मुख्यालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी येत्या 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. या पायाभरणी सोहळ्याचा कार्यक्रम ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये करण्यात आले आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

आज नोंदणी कार्यशाळा
भाजपतर्फे गुरुवार 22 रोजी जिल्हा पातळीवरील सदस्य नोंदणी कार्यशाळा मडगाव व म्हापसा येथे घेण्यात येणार आहे. तसेच, येत्या 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी प्रत्येक मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणी कार्यशाळा घेतल्या जाणार आहे. 31 ऑगस्टला शक्ती केंद्रावरील कार्यशाळा घेतली जाणार आहे.