बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणातील एक संशयित आरोपी ॲड. अमित पालेकर हे विनापरवानगी विदेश दौरा केल्याने अडचणीत आले आहेत. न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता परदेशात जाऊन जामीन अटीचा भंग केल्याप्रकरणी ॲड. पालेकर यांचा जामीन रद्द करण्याची विनंती करणाऱ्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अर्जावर फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित आरोपी ॲड. अमित पालेकर यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
बाणस्तारी येथील मर्सिडीस कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात संशयित आरोपी म्हणून ॲड. पालेकर यांना ऑगस्ट 2023 मध्ये अटक केली होती. फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित ॲड. पालेकर यांची जामिनावर सुटका केली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाने पालेकर यांनी न्यायालयाची परवानगी न घेता विदेश दौरा करून अटीचा भंग केल्याचा दावा न्यायालयात केला आहे.