बांगलादेशमधील शेख हसिना सरकारला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडताना जी यादवी त्या देशात माजली, त्याचा फायदा उठवत तेथील धर्मांध शक्ती तेथील हिंदू अल्पसंख्यक समुदायाच्या जिवावर उठल्या आहेत आणि ही बाब अतिशय अस्वस्थ करणारी आहे. बांगलादेशमध्ये यापूर्वीही तेथील हिंदू नागरिकांवर, मंदिरांवर हल्ले होत आले, परंतु जोवर शेख हसिना सरकार सत्तारूढ होते, तोवर निदान हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला धावून जात असे. मात्र, आजच्या परिस्थितीत तेथे सरकारच अस्तित्वात नाही, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मागमूसही दिसत नाही. पोलीस स्थानकेच जाळली गेली आहेत आणि लष्करच आंदोलकांच्या पाठीशी उभे आहे. याचा फायदा उठवत जमाते इस्लामी, हिफाजत ए इस्लाम ह्यासारख्या धर्मांध शक्तींनी तेथील अल्पसंख्यक हिंदूंना नियोजनबद्धरीत्या लक्ष्य करण्याचा, त्यांची घरेदारे, व्यवसाय लुटण्या – जाळण्याचा, मंदिरांची नासधूस, जाळपोळ करण्याचा सपाटा लावला आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी बांगलादेशमधील अल्पसंख्यकांप्रती जी चिंता व्यक्त केली आहे, ती अनाठायी नाही. खरोखरच तेथील परिस्थिती भयावह आहे. हे विधान कोण्या ‘रिपब्लिक’ सारख्या प्रचारकी वाहिन्यांच्या बातम्यांच्या आधारे आम्ही केलेले नाही, तर बांगलादेशमधील आघाडीची इंग्रजी व बांगला वर्तमानपत्रे तेच वास्तव दाखवत आहेत. बांगलादेशमधील किमान सत्तावीस जिल्ह्यांमध्ये हिंदू नागरिकांवर हल्ले झाले आहेत. त्यांचे व्यवसाय, घरेदारे जाळली गेली आहेत, लुटली गेली आहेत, महिलांवर अत्याचाराच्या थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. केवळ अवामी लीग समर्थकच नव्हे, तर ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा आम अल्पसंख्यकांनाही ह्या अराजकाची भीषण झळ सध्या बसलेली दिसते. बांगला लोकगायक राहुल आनंदाचे दीडशे वर्षे जुने घर लुटले आणि जाळले गेले. त्याची वाद्येदेखील जाळली गेली. ह्या अशा रानटी हल्ल्यांच्या नावनिशीवार बातम्यांनी बांगलादेशमधील विश्वासार्ह वर्तमानपत्रांची पाने भरली आहेत. अवामी लीगच्या समर्थकांवर तर अस्मानी सुलतानीच कोसळली आहे. काही अवामी नेत्यांना कुटुंबीयांसह जिवंत जाळले गेले. एका नेत्याचे हॉटेल आतील चोवीस जणांसह जाळले गेले. हा निव्वळ रानटीपणा आहे. बांगलादेशला जर आधुनिक जगामध्ये आपले आजवरचे स्थान कायम राखायचे असेल तर ह्या सध्याच्या अराजकावर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक असेल. सत्तापालटानंतर हे भान काहींना येऊ लागले आहे. त्यामुळे बांगलादेशची प्रतिमा सावरण्यासाठी सध्याच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व नोबेलविजेते डॉ. महंमद युनूस यांना देण्याचा प्रस्ताव पुढे केला गेला. युनूस यांच्याकडे सूत्रे सोपवल्याने सध्याच्या अराजकामुळे जगात होणारी छी थू टळेल असा त्यामागील विचार आहे. अल्पसंख्यकांच्या घरांना व मंदिरांना संरक्षण पुरवले जात असल्याचा देखावाही सध्या उभा केला जातो आहे, परंतु जाळपोळ आणि हल्ल्यांच्या बातम्यांची व्याप्ती पाहिली तर हे प्रयत्न फार अपुरे भासतात. आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनाचा ताबा धर्मांध प्रवृत्तींनी केव्हाच घेतला व त्याला सर्वस्वी राजकीय स्वरूप दिले तेव्हाच पुढे काय होणार ह्याची चाहूल लागली होती. बांगलादेशमधील लोकशाहीला सर्वांत मोठा धोका सध्या पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. वंगबंधू मुजीबूर रेहमान यांच्या हत्येनंतर जो काळा कालखंड त्या देशात येऊन गेला, त्यावर मात करीत लोकशाही तेथे प्रस्थापित झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा त्या काळ्या कालखंडाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. वास्तविक तेथील संविधानाचे कलम 28 (1) कोणत्याही नागरिकाबाबत जात, पात, वंश, धर्मावरून भेदभाव करणार नसल्याची ग्वाही देते. परंतु आज ह्या संविधानाचेच भवितव्य धोक्यात आलेले आहे. लष्कराने आंदोलकांना साथ दिली आणि शेख हसिना यांना पंचेचाळीस मिनिटांत देश सोडून जायला सांगितले. पण शेवटी सत्ता कोणाची येणार, लोकशाही टिकून राहणार की पुन्हा लष्करशाही अवतरणार याची उत्तरे अद्याप स्पष्ट नाहीत. शेख हसिना सध्या भारतात आहेत. त्या उद्या ब्रिटनने राजाश्रय बहाल केला तर तेथे सुखाने आपले उर्वरित जीवन घालवतील. परंतु बांगलादेशमधील अल्पसंख्यकांचे काय? त्यांना वाली कोण? मानवतावादाचे ढोंगी कैवारी ह्याबाबत मात्र सोईस्कर मौन पत्करून बसले आहेत. भारत सरकारने ह्यासंदर्भात केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये. ह्या अल्पसंख्यक हिंदू समुदायाच्या सुरक्षेसाठी बांगलादेश लष्कर आणि प्रशासनावर दबाव आणून त्यांना ह्या संकटकाळी साथ द्यावी. बांगलादेशातील अराजकाने पुन्हा एकदा दुसरे पाकिस्तान निर्माण केले आहे!