मुंबईचे बदलते चित्र…

0
75
  • शरत्चंद्र देशप्रभू

या टॉवर-संस्कृतीत जीवन सुरक्षित राहील का? टॉवरची पाण्याची, विजेची भूक भागेल का? भागलीच तर कुणाचा बळी देऊन? या गगनचुंबी टॉवरात राहणाऱ्याला झोप कशी लागते हे एक आश्चर्यच!

पाच वर्षांनी दादरला वामन हरी पेठे यांच्या ‘ब्ल्यू जेम’ या हॉटेलमध्ये चार दिवसांसाठी मुक्काम करण्याचा योग आला. गोवेकरांची पसंती असते ती ‘अमेय’ हॉटेलला. परंतु का कोण जाणे, ‘गोवा भवन’चे दुरुस्तीकाम पंधरा वर्षांपूर्वी सुरू झाले अन्‌‍ पर्यायी व्यवस्था म्हणून ‘ब्ल्यू जेम’ने मला आधार दिला. इथले वयस्क कर्मचारी वारंवार केलेल्या वास्तव्यामुळे परिचित. कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’ला आरंभ होण्यापूर्वी याच कर्मचाऱ्यांशी मी संपर्क साधला होता. मनाची घालमेल झाली होती. जावे की न जावे? त्याचवेळी इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे आठवते, ‘प्रभादेवी मंदिराच्या दर्शनाला भाविकांवर निर्बंध लादले आहेत अन्‌‍ दादरचे अपवादात्मक लोक नाकाला फडके लावून फिरत आहेत. आम्ही तत्काळ निर्णय घेतला अन्‌‍ जाणे स्थगित. नंतर लॉकडाऊन अमलात आणला गेला. कडक निर्बंध असताना आम्ही दादरला अडकलो असतो. पाणी, अन्न हे सारे अप्राप्य झाले असते. या कर्मचाऱ्यांच्या ग्राम्य बोलीमुळे आम्ही वाचलो.
उसंत मिळाल्यावर या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून या हॉटेलचा नव्हे तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक पट उलगडतो. नामवंत साहित्यिक, नाटककार, गीतकार, नटांनी या हॉटेलात वास्तव्य केल्याचे समजले. सुधीर गाडगीळ तर एकवेळ इथेच भेटले. वसंत कानेटकर, जगदीश खेबुडकर, प्रसाद सावकार अन्‌‍ असंख्य कलावंतांच्या वास्तव्याने ही वास्तू पुनित झाली आहे. वाढत्या वयामुळे पुष्कळशी नावे आठवत नाहीत. परंतु सुधीर गाडगीळांच्या दिलदार स्वभावाबद्दल हे भरभरून बोलतात.


पूर्वी मराठी रंगभूमीवरील मोठमोठ्या नटमंडळींचा मुक्काम लॉजेस्‌‍मध्ये होता. बालगंधर्वांचा मुक्काम गोव्यात असताना ‘सरदारगृह’ या लॉजमध्ये झाल्याचे आजोबांकडून ऐकले होते. लॉजचे मालक धारगळकर देसाई अन्‌‍ बालगंधर्व यांचा तोंडावळा समान. आता नटमंडळींच्या वेगळ्याच मागण्या, विमान प्रवास अन्‌‍ पंचतारांकित हॉटेलमधील निवास. पूर्वीची नाटके मनात घर करत. धुंदी एक महिना टिकत असे. आता थिएटरचा उंबरठा ओलांडला की नाटकाचा विषय तिथेच थांबतो. नटमंडळीचा नाटकाबद्दल व्यावसायिक दृष्टिकोन अन्‌‍ काळाचा महिमा ही कारणे असतील. परंतु त्या काळच्या नटमंडळीने केलेली रंगभूमीची निरलस सेवा नाट्यरसिकांना भावत असे. ‘ब्ल्यू जेम’ हे मध्यमवर्गीयांना आवडेल असे हॉटेल. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रशस्त खोल्या अन्‌‍ बाहेर डोकावले तर समांतर उंचीवर दिसणारे गुलमोहराचे डेरेदार वृक्ष अन्‌‍ लाल फुलांचे पसरलेले गालिचे. वसंत ऋतूत कोकीळ-गुंजन हे आणखी एक आकर्षण. या अन्‌‍ कौटुंबिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे हॉटेल कलावंतांना आपलेसे वाटले असेल. आता कॉर्पोरेट संस्कृतीत वाढलेल्या पिढीला हे हॉटेल कसे काय आकर्षित करू शकेल?
दादरमधील रानडे अन्‌‍ एन. सी. केळकर रोड म्हणजे मध्यम अन्‌‍ कनिष्ट मध्यम वर्गीयांचे शॉपिंग सेंटर. या सेंटरला जरा उशिराच जाग येते. परंतु इथली आस्थापने रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहकसेवेत मग्न असतात. फेरीवाले पदपथ अडवून जोरदार व्यवसाय करताना दिसतात. छोटीमोठी दुकाने पण कमावलेल्या दृष्टीने ग्राहकांचा वेध घेताना दिसतात. फळे, भाजी अन्‌‍ रोजच्या गरजेच्या वस्तू पदोपदी आढळतात. मंडईला जाण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु गेल्या वर्षी एक बदल ठळकपणे नजरेत भरला. फळे, भाजी, लिंबू, मिरची, कोथिंबीर विकणारे ग्राहकांशी, विशेषतः मराठी माणसांशी हिंदी भाषेतून संवाद साधताना दिसले. विक्रेते अन्‌‍ गिऱ्हाईक हे मराठी असून संवाद हिंदीतून! याला शासन मराठी भाषेची गळचेपी करत आहे असे कसे म्हणावे? या पार्श्वभूमीवर अन्नपूर्णा ज्यूस सेंटर चालवणारे उत्तर प्रदेशचे मालक अस्खलीत मराठीतून संवाद साधताना दिसले. दादरला भेट दिल्यावर या ज्यूस सेंटरमधील गाजर-बीट रस पिणे हा माझा वीस वर्षांतला शिरस्ता. गाजराच्या रसाच्या ग्लासाची किंमत पाचवरून तीसवर आली. काचेचे ग्लास बदलले अन्‌‍ पुठ्ठ्याचे आले; परंतु तोच दर्जा अन्‌‍ तीच चव!


दादरची उपाहारगृहे म्हणजे माझा आवडीचा, कुतूहलाचा विषय. महाराष्ट्रीयन पद्धतीच्या शाकाहारी उपाहारगृहांबद्दल तर मला विशेष ओढ. कारण येथे मिळणारे काही पदार्थ तर गोव्यातील कुटुंबांतून केव्हाच गायब झालेत. नव्या पिढीला ती नावे, संदर्भांबाबत पण पूर्ण अज्ञान. साबुदाणावडा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ, राजगिऱ्याच्या पुऱ्या, कोथिंबीर वड्या, सानोऱ्या तसेच उपवासासाठीचे खास असे पदार्थ, जसा वऱ्यांचा भात, कांदा-लसूण नसलेले पदार्थ. शिवाय साजूक तुपातला शिरा अन्‌‍ तिखट पोह्यांचा स्वाद घ्यावा तो इथल्या उपाहारगृहांतच. असह्य उकाड्याचा त्रास कमी करण्यासाठी तर पियूष, लस्सी, गुलाबाचे दूध आहेच. शिवाय दही, ताक पण दर्जेदार. आता हळूहळू ही खाद्यसंस्कृती अस्तंगत होते की काय अशी शंका आज खवय्यांच्या मनात उठेल! गोखले रोडवरचे ‘दत्तात्रय’ तर केव्हाच बंद पडले. ‘प्रकाश’ पण याच रोडवर. येणाऱ्या टॉवरमुळे ते बंद झालेय. केळकर रोडवरचे ‘तांबे भुवन’ पण टॉवरच्या बांधकामामुळे बंद पडलेय. कदाचित बांधकाम पूर्ण झाल्यावर ते उघडले जाईल. परंतु तोपर्यंत सारा भार ‘तृप्ती’ सांभाळेल. अन्य उपाहारगृहे आली आहेत, परंतु खास दर्जा व चव अन्‌‍ बाज याच उपाहारगृहांत. ‘सिंधुदुर्ग’ हे मांसाहारी जेवण देणारे हॉटेल आता बंद झाल्याचे संकेत मिळतात. ‘प्लाझा’ सिनेमालगत असलेल्या ‘गोमंतक’ या मांसाहारी जेवण देणाऱ्या हॉटेलने आपली शान टिकवली आहे. गिरगावच्या ‘अनंताश्रम’ने तर इतिहास घडवला. आज काही प्रमाणात का होईना, हा वारसा ‘गोमंतक’ चालवत आहे. येथे गेलो तर कितीतरी गोवेकर भेटतात. पदार्थांची चव जिभेवर रेंगाळते तर गप्पांचा गंध मनात दरवळतो. ‘मालवणी कट्टा’ हे दुसरे हॉटेल चाळीच्या तळमजल्यावर होते. आता ते नव्या टॉवरात त्याच जागेवर दिमाखाने उभे आहे. आज या साऱ्या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीपुढे नव्याने येणाऱ्या विविध पदार्थांच्या उपाहारगृहांचे आव्हान आहे. परंतु ही खाद्यसंस्कृती टिकविणे नव्या पिढीवर, किंबहुना त्यांच्या पालकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. अस्तंगत होणाऱ्या जुन्या पदार्थांची उपयुक्ततता नव्या पिढीला पटवून देण्याचे कार्य आजच्या पालकाला करणे अत्यावश्यक. संस्कृतीच्या नव्हे तर पाल्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने.
दादर वेस्ट भागात आता टॉवर संस्कृती चांगलीच रुजू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. पस्तीस ते चाळीस मजली गगनचुंबी टॉवर अन्‌‍ त्यांचे गगनाला भिडणारे भाव. चाळीतील विस्थापित रहिवाशांची सेटलमेंट झाली असेल, काहींना नव्या टॉवरमध्ये जागा मिळाली असेल, तर काहींनी मोबदला घेऊन उपनगराकडे मोर्चा वळवला असेल. इथल्या देखभालीचा खर्च पण अफाट असेल. मध्यमवर्गीयांना तो परवडेल की नाही हाही एक प्रश्नच. आता तर दक्षिण मुंबई विभागात पण प्रचंड प्रमाणात टॉवर येण्याचे संकेत मिळतात. विशेषकरून वरळी भागात. ट्रंप टॉवर पण येऊ घातलेत. आमच्या मनातील वरळी म्हणजे आचार्य अत्र्यांची ‘शिवशक्ती’ असलेली वरळी, नंतरची शिवसेनेची बालेकिल्ला असलेली वरळी, मराठी साहित्यविश्वात अजरामर झालेला वरळी नाका, येथील सी-फेस… आता हळूहळू येथे पण कायापालट होणार. स्थानिक उपनगरांत फेकले जाणार. नवीन रहिवाशांसाठी नवी उपनगरे वसवली जाणार. ही अक्राळविक्राळ वाढ आता थोपविणे कुणाच्याच हातात राहिलेले नाही. प्रश्न पडतो, या टॉवर-संस्कृतीत जीवन सुरक्षित राहील का? अग्निशामक दलाला दुर्घटनेत रहिवाशांना दिलासा देण्यात यश येईल का? टॉवरची पाण्याची, विजेची भूक भागेल का? भागलीच तर कुणाचा बळी देऊन? या गगनचुंबी टॉवरात राहणाऱ्याला झोप कशी लागते हे एक आश्चर्यच! दादरच्या एका दुकानाच्या शटरच्या सहा फूट जागेत दोन छोटी मुले शांत झोपली होती. वाहनांचा, लोकांचा कलकलाट यांच्या निद्रेत बाधा आणत नव्हता. मुले मजुराची किंवा फेरीवाल्यांची असतील. जागतिकीकरणामुळे आलेल्या बेफाम प्रगतीमुळे श्रीमंत अन्‌‍ दरिद्री यातील दरी वेगाने रुंदावते आहे. प्रगतीमुळे आलेले फायदे खोलवर झिरपतात, परंतु किमान गरजा पुरविण्याइतपत नाही.


मुंबईकरांचा चेहरा सहसा चिंताग्रस्त दिसत नाही. दादरला भुयारी रेल्वेचे काम काही वर्षांपासून चालू आहे. टॉवरची कामे पण पदोपदी चालू आहेत. अरुंद रस्ते यामुळे जास्त अरुंद झालेत. छोट्या आस्थापनांनी सजलेले टिचभर रूंद बोळ अन्‌‍ गल्ल्या. या साऱ्यामुळे दादरकरांची चीड होत असेल, तत्कालिक हतबलता आली असेल. परंतु चेहऱ्यावर ही चिडचिड जाणवत नाही. रोजचे व्यवहार पदपथावर, आस्थापनात चालूच असतात. धूळ प्रदूषण, पाण्याचे रस्त्यावर हबकारे, हिरव्या रंगाची कापडी ओली आच्छादने हे उपाय निर्विकारपणे चालूच असतात. यांच्या देहबोलीतून सहजयोग प्रतीत होत असल्याचे चित्र डोळ्यांसमोर उलगडते. ताणविरहित जीवनशैली हे परिस्थितीचे वरदान हाच बहुधा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीत, अन्यायग्रस्त वातावरणात यांची वाटचाल आपल्या अनोख्या अंगाने, ढंगाने अव्याहतपणे चालूच असते. कदाचित प्रदूषित वातावरणात पण यांना मानसिक तोल सांभाळण्याच्या उपजत कसबामुळे ऊर्जासंचय अन्‌‍ संवर्धन होऊन अनारोग्यापासून यांचा बचाव होत असावा.


1963 साली आम्ही पहिल्यांदा मुंबईला पाऊल ठेवले. अधून-मधून माहिमला आईच्या मावशीकडे मुक्काम असायचा. इथून रमतगमत दादरला जायचो. पॅरॅडाईज्ड थिएटरात ढेकणांचे चाळे सहन करत पाहिलेल्या चित्रपटांचा कंटाळा आला की दादरला वातानुकूलित ‘प्लाझा’मध्ये पाहिलेला कुठलाही सिनेमा आवडत असे. ‘कोहिनूर’मध्ये पाहिलेला अन्‌‍ न समजलेला ‘बैजू बावरा’ आठवतो. काळ बदलला तसे दादर बदलले. शिवाजी मंदिराबाहेर फेरफटका मारताना ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्र्यांच्या बेफाम विनोदी नाटकाच्या प्रयोगाचा फलक दिसला, बरे वाटले. आणखी एका फलकाने लक्ष वेधले. मोडी लिपी शिकविणाऱ्या कार्यशाळेने. हेमाद्री हेमाडपंतांची मोडी आमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात होती. गोव्यात हिशेब याच लिपीत लिहिले जात होते. आजच्या टॉवरांकित दादरात कुणी मोडी शिकवण्याचा ध्यास घेतो अन्‌‍ युवा पिढी ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करते हे असंभवनीय, अनाकलनीय वाटते. दादरची मूळ संस्कृती, अस्मिता टिकविण्यासाठी हा प्रयास आजच्या युगात अनाठायी आहे की मूल्य संवर्धक आहे, हे काळच ठरवेल! हे बदल टिपणारे संवेदनशील मन अन दृष्टी टिकवावी लागेल.