मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतली मोदींची भेट
गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी वळवण्याकरता कर्नाटक सरकारच्या कळसा-भांडुरा पाणी प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी द्यावी या मागणीसाठी कनाटक सरकारने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या प्रकल्पाला पर्यावरण व वन्यजीव यांचा परवाना मिळावा अशी मागणी सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वरील प्रकरणी एक तपशीलवार पत्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले असून या पत्रातून कर्नाटक राज्याच्या प्रमुख मागण्या मोदी यांच्यासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या मागण्या कर्नाटक राज्याच्या विकासासाठी असल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट करून त्यात प्रामुख्याने कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्यासंबंधीची मागणी आहे.
म्हादई जलतंटा लवादाने 2018 साली कर्नाटक राज्याला 13.42 टीएमसी एवढे पाणी देण्याची सूचना केलेली असून त्यापैकी 3.90 टीएमसी पाणी हे पिण्यासाठी असल्याचे वरील पत्रातून कनाईटक सरकारने स्पष्ट केले आहे.
कर्नाटक सरकारने फेरबदल केलेला कळसा-भांडुरा नाला वळवणे योजनेसाठीचा आपला पूर्व व्यवहार्यता अहवाल 16 जून 2022 रोजी केंद्रीय पाणी आयोगाकडे सुपूर्द केला होता. म्हादईवरील कळसा नाल्याचे पाणी वळवण्यासाठीच्या योजनेचे काम विनाविलंब सुरू करता यावे यासाठी केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय वन्यजीवमंडळाला विनाविलंब बैठक घेण्याची सूचना करावी अशी मागणी कर्नाटक सरकारने या पत्रातून केली आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सध्या हे प्रकरणी प्रलंबित आहे.