बांबोळी येथील कॅसिनोवरील छाप्यात 11 जणांना अटक

0
10

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने बांबोळी येथील एका नामांकित कॅसिनोमध्ये सुरू असलेल्या बेकायदा पत्त्यांच्या जुगारावर छापा 11 जणांना अटक करून सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बांबोळी येथील एका नामांकित कॅसिनोमध्ये बेकायदा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी रात्री 11.50 ते रविवारी मध्यरात्री 1.45 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. कॅसिनोमध्ये दोन टेबलांवर पत्त्याचा जुगार सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत अकराजणांना ताब्यात घेतले. त्यात एक व्यवस्थापक, दोन कर्मचारी आणि जुगार खेळणाऱ्या 8 जणांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन टेबल, 14 टॅबलेट्, पत्ते, 2 लाईव्ह कार्ड शफलर्स, 2 कार्ड स्कॅनर, 28 लाख रुपयांची चिप्स आणि इतर जुगार साहित्य मिळून 33 लाख रुपये किमतीचे सामान हस्तगत केले.

पोलिसांनी अकराजणांना गोवा जुगार कायद्याच्या कलमाखाली अटक करून त्यांची प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका केली आहे. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर रामानन यांनी ही कारवाई केली.