पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून विदेश दौऱ्यावर

0
31

>> इटलीतील जी-7 शिखर परिषदेत सहभागी होणार; उद्यापासून 2 दिवस परिषद

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर पदभार स्वीकारत देशाच्या काराभाराची सूत्रे देखील हाती घेतली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि. 13) विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा असून, ते इटलीला जाणार आहेत. इटलीमध्ये जी-7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून, या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत.

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटलीच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. इटलीमध्ये 14 ते 15 जून या कालावधीत जी-7 शिखर परिषद पार पडणार आहे. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य महत्वाचे नेते या शिखर परिषदेला उपस्थित असणार आहेत. या शिखर परिषदेमध्ये जागतिक पातळीवरील काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जून रोजी होणाऱ्या 50 व्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर या दौऱ्यावेळी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांच्यासह आदींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

शिखर परिषदेत कोणत्या विषयांवर चर्चा होणार?
इटलीत होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत अमेरिका, भारत, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा, जपान, ब्रिटन या देशांच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी जी-7 शिखर परिषदेत रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच काही जागतिक विषयांवरील मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.