रियासी बस हल्ल्यामागील दहशतवाद्यांची नावे स्पष्ट

0
7

जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर गोळीबार करणारे दहशतवाद्यांची नावे समोर आली असून, अबू हमजा आणि अधुन अशी त्यांची नावे आहेत. या दोघांचे छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केले आहे. याआधी राजौरी आणि पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागेही या दोन दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला होता. त्यात बस दरीत कोसळून 10 जण ठार झाले होते, तर 33 जण जखमी झाले होते. ही बस शिव खोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात असताना पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि ही बस खोल दरीत कोसळली.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय लेफ्टनंट गव्हर्नर यांनी जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल या सुरक्षा दलांनी राजौरी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेरियाथ-पोनी-शिव खोडी परिसराला वेढा घातला आहे. याशिवाय ड्रोन आणि स्निफर डॉगसह टेहळणी उपकरणांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी राजौरी आणि रियासीच्या वरच्या भागात लपून बसले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे.