पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेची गंभीर दखल घेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी या अपघात प्रकरणाचा आढावा घेतला. ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देतानाच स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन सुद्धा फडणवीस यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पोहोचताच, पोलिस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय तपास झाला, पुढची कारवाई काय आणि यापुढे अशा घटना घडू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती घेतली. पोलिसांनी या घटनेत भादंविचे 304 हे कलम लावले आहे, 304 अ लावलेले नाही. त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली. या प्रकरणातील मुलगा हा 17 वर्ष 8 महिन्यांचा आहे; पण निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार, गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. हीच बाब पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केली आहे; पण बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतलेली नाही, असे फडणवीसांनी सांगितले.
बाल न्यायाधिकरणाचे सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला. पोलिसांनी तातडीने वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बाल न्यायाधिकरणाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता निश्चितपणे बाल न्यायाधिकरण फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे, असे फडणवीस म्हणाले.