>> ‘इंडिया’ आघाडीचा पत्रकार परिषदेत दावा
राज्यात मंगळवार दि. 7 मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केलेले असून हा कौल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे यंदा उत्तर गोवा तसेच दक्षिण गोवा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवारांचाच विजय होणार आहे, असा दावा काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत तसेच इंडिया आघाडीचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.
यावेळी बोलताना अमित पाटकर यांनी, आम्ही जेव्हा जेव्हा प्रचारासाठी जात होतो तेव्हा तेव्हा स्थानिक लोक सत्ताधारी भाजपविषयी राग व संताप व्यक्त करताना दिसत होते. 7 मे रोज मतदान करतानाही त्यांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध हा रोष दाखवला असल्याचे सांगितले. गोवा व गोव्याचा निसर्ग आणि संस्कृती वाचवण्यासाठी राज्यातील जनतेने इंडिया आघाडीच्याच उमेदवारांना भरभरुन मते दिली असल्याचा दावा पाटकर यांनी यावेळी केला.
आम आदर्मी पक्षाचे नेते अमित पालेकर यावेळी म्हणाले की, मतांची टक्केवारी पाहिल्यानंतर लोकांचा लोकशाहीवर विश्वास आहे हे दिसून येते. यंदा जनतेने भाजपविरोधात मतदान केले असल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते जुझे फिलीप डिसोझा यांनी, लोकांनी सत्ताधारी भाजपच्या रागाने मोठ्या संख्येने स्वतःहून पुढे येऊन मतदान केलेले आहे व यावेळी दोन्ही जागांवर इंडिया आघाडीचाच विजय होणार असल्याचे सांगितले.
गोवा फॉरवॉर्डचे नेते दुर्गादास कामत म्हणाले की, सरकारने आश्वासन देऊनही गेली 10 वर्षे खाणी सुरू न केल्याने खाणपट्टयातील जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे खाणपट्ट्यातील लोकांनी मोठ्या संख्येने बाहेर येऊन मतदान केले असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय बेरोजगारीच्या प्रश्नावरुनही युवावर्ग नाराज असल्याचे ते म्हणाले.