डबल इंजिन सरकारमुळे विकास : खंवटे

0
15

>> पर्वरी मतदारसंघात भाजपच्या कोपरा बैठका

डबल इंजिन सरकारमुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. रस्ते, पूल यांच्या विस्तारित जाळ्यामुळे दळणवळणाची सेवा सुधारली आहे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना जातीभेदाविना तळागाळातील लोकांना लाभदायक ठरल्या आहेत. औद्योगिक गुंतवणुकीसाठी निर्माण केलेल्या पोषक वातावरणाने देशात नवीन उद्योग येत आहेत. परिणामी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी पर्वरीत आयोजित करण्यात आलेल्या कोपरा बैठकांत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पर्यटनमंत्री तथा पर्वरी मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे यांनी मागील काही दिवसांत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विविध भागात कोपरा बैठका घेतल्या. प्रत्येक सभेत केंद्रात मोदी व गोव्यात डॉ. सावंत सरकारच्या डबल इंजिन सरकारची कामगिरी खंवटे यांनी लोकांसमोर ठेवली. यावेळी विविध पंचायतींचे सरपंच व पंच उपस्थित होते.

दरम्यान, खंवटे यांनी पर्वरीसह सांताक्रुझ मतदारसंघातही दोन कोपरा सभांना उपस्थित राहून मार्गदर्शन केले. पर्वरी मतदारसंघातील एकतानगर, गोपाळनगर, ओव्हल पार्क, सरकारी व पोलिस वसाहत, कवळेकर सुपर मार्केट, महारूद्र वसाहत आदी ठिकाणी त्यांनी कोपरा बैठकांत मार्गदर्शन करताना भाजपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

घराघरांत नळ, वीज, गॅस जोडण्याद्वारे लोकांचे राहाणीमान सुधारण्याचे जे प्रामाणिक प्रयत्न झाले त्यातून मोदी सरकारची जनतेप्रती असलेली तळमळ स्पष्ट होत असल्याचे खंवटे यांनी सांगितले. मोदी सरकारने भारताला ज्या स्तरावर नेले आहे, त्याहूनही अधिक उंची गाठण्यासाठी देशात पुन्हा मोदी सरकारची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.