राज्यात महिलांवरील गुन्ह्यांत वाढ

0
16

>> इंडिया आघाडीच्या नेत्यांचा सरकारवर आरोप

इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना गेल्या चार ते पाच वर्षांत राज्यात महिलांवर होणारे बलात्कार व खुनांच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचा आरोप केला. हे गुन्हे घडत असताना ते नियंत्रणात आणण्यासाठी गृह खाते व पोलीस आवश्यक ती पावले उचलत नसल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्या मनिषा उसगावकर, आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या सेसील रॉड्रिग्ज व गोवा फॉरवर्डच्या प्रवक्त्या अश्मा बी यांनी केला.

गेल्या चार, पाच वर्षांत 18 वर्षांखालील मुलींविरूद्ध झालेल्या गुन्ह्यांची संख्या ही तब्बल 250 एवढी आहे. मात्र, ह्या 250 गुन्ह्यांतील केवळ 4 गुन्हेगारांना शिक्षा झालेली असून ही टक्केवारी केवळ 1.6 एवढी असल्याचे अश्मा बी यांनी यावेळी सांगितले. 2019 ते 2023 ह्या काळात राज्यात बलात्काराची प्रकरणे वाढल्याचे त्या पुढे बोलताना म्हणाल्या. या घडीला राज्यात आठवड्याला महिलांवर बलात्कार व अन्य गुन्हे मिळून किमान 5 गुन्ह्यांची नोंद होत असते असे बी यांनी नमूद केले. कुणीही कुठूनही गोव्यात येतो व येथील महिलांवर अत्याचार करतो, अथवा तिचा खून करतो, किंवा अपहरण, विनयभंग, मारहाण करतो असे चित्र पहावयास मिळत आहे. देशभरातील गुन्हेगारांसाठी गोवा हे एक सुरक्षित नंदनवन बनले असल्याचा आरोप बी यांनी केला.

काँग्रेस प्रवक्त्या उसगावकर म्हणाल्या की केंद्रातील मोदी सरकारचे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ फोल ठरले आहे. भाजपचे डबल इंजिन सरकार राज्यातील महिलांप्रती संवेदनशील नाही. परराज्यातून गोव्यात आलेल्या एका महिलेने स्वत:च्या पाच वर्षांच्या कोवळ्या मुलाचा खून करून प्रेत बॅगेत भरून ती राज्याबाहेर गेली होती याची आठवणही उसगावकर यांनी करून दिली.

आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या रॉड्रिग्ज यांनी यावेळी बोलताना गोवा हे गुन्हेगारीसाठीचे केंद्र बनले असल्याचा आरोप केला. राज्याचे गृह खाते झोपा काढीत असल्याने गुन्हेगारीत वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा पोलीस राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही रॉड्रिग्ज यांनी केला. महिलांवरील गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या गृह खात्याने सक्रीय बनावे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना मुक्तहस्त द्यावा, अशी मागणी केली.