>> मुख्य सचिवांनी आव्हान याचिका फेटाळली
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्याच्या तडीपारीच्या आदेशाला आव्हान देणारी शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचे पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जुआन यांची याचिका राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित प्राधिकरणाने काल फेटाळून लावली. त्यामुळे आता पास्टर डॉम्निक डिसोझा व त्याच्या पत्नीला उत्तर गोव्यातून तडीपार व्हावे लागणार आहे.
पास्टर डॉम्निक डिसोझा याच्याविरोधात धर्मांतराशी संबंधित अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी एका अर्जाद्वारे डिसोझा याला उत्तर गोव्यातून तडीपार करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या अर्जावर सुनावणी घेऊन तडीपारीचा आदेश जारी केला. त्याच्याविरोधात 2009 सालापासून पोलिसांत 9 तक्रारींच्या आधारे गुन्हे नोंद आहेत. त्यातील तीन गुन्हे धर्मांतराशी संबंधित आहेत. तसेच त्याच्याविरोधात धर्मांतराचा प्रयत्न तसेच फसवणूक केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याच्या पत्नीला अटक करून जामिनावर सोडले आहे. मागील दोन वर्षांपासून त्याच्याविरुद्ध धर्मांतर प्रकरणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. म्हापसा पोलीस स्थानकात 7, तर गुन्हा अन्वेषण विभागात 2 गुन्हे दाखल आहेत.