>> भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे आवाहन
>> इंडिया आघाडी नेतृत्वहीन असल्याची टीका
पंतप्रधान पदासाठी अद्याप नेता न ठरलेल्या नेतृत्वहीन अशा इंडिया आघाडीकडे आपल्याला देशाची सत्ता सोपवायची आहे की भक्कम, सशक्त, विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या मोदी सारख्या कणखर नेत्याला परत एकदा पंतप्रधान बनवायचे आहे, याचा निर्णय गोव्यातील जनतेने घेतला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत येथे काल केले.
एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी जनतेच्या मनात भीती पसरवत आहेत की, घटनेत बदल करण्यासाठी भाजपाला 400 पार जागा हव्या आहेत. तर दुसरीकडे त्यांचेच नेते गोव्याला विशेष दर्जा देण्यासाठी राहुल गांधी यांच्या परवानगीने घटनेत बदल करणार असल्याचे सांगत आहेत. कुटुंब प्रमुखाच्या निधानानंतर त्याच्या संपत्तीचा मोठा वाटा शासनाकडे जमा करण्यासाठी काँग्रेस वारसा कर लागू करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे मोदी सरकार ठोस योजना राबवून त्याची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात वळवत आहे, असे राष्ट्रीय सरचिटणीस तावडे यांनी सांगितले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळी भंडारा मतदारसंघातून अधिकृत तिकीट देऊन पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले. तर भाजपाने 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती दिनी संविधानाची प्रत समोर ठेवून आपला जाहीरनामा – संकल्प पत्र प्रसिद्ध केले.
वारसा कर लादण्याचा काँग्रेस पक्षाचा विचार
काँग्रेसचा डोळा जनतेच्या वाडवडिलांच्या संपत्तीवर, पैशांवर असल्यानेच वारसा कर लादण्याचा विचार केला जात आहे. हे पैसे कोणाला मिळणार याचे संकेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दिलेले आहेत. यातून काँग्रेस काय करू शकते यांचा अंदाज येऊ शकतो. या उलट भाजप सरकारने आरोग्य विमा, जलजीवन मिशन, स्टार्ट अप, पीएम उज्ज्वला योजनेद्वारे एलईडी बल्ब, मातृवंदना, स्वच्छ भारत, किसान सन्मान अशा अनेक माध्यमांतून जनतेला आर्थिक साह्य केलेले आहे, असे तावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुद्दे नसल्याने विरोधक फसतात. संविधानाविषयी गोव्यातील उमेदवाराने केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. कारण ती काँग्रेसची नीती आहे, अशी टीका तावडे यांनी केली.
तामिळनाडू, केरळमध्ये भाजपच्या जागा वाढणार
दक्षिण भारतात तामिळनाडू व केरळमध्ये भाजपा उल्लेखनीय कामगिरी करणार असे वातावरण आहे. गोव्यातील दोन्ही जागा जिंकल्यास त्याचे श्रेय राष्ट्रीय आणि स्थानिक नेतृत्वच नव्हे तर मोदी म्हणतात त्याप्रमाणे बूथवरील प्रत्येक कार्यकर्त्याचे असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर व प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर उपस्थित होते.