काँग्रेसच्या उमेदवारांचेही अर्ज सादर

0
10

पणजी आणि मडगावात घडवले शक्तिप्रदर्शन; अर्ज सादरीकरणावेळी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

काल काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पणजी व मडगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आपापले उमेदवारी अर्ज भरुन दाखल केले. उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड्. रमाकांत खलप यांनी पणजीत उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरुन सादर केला, तर दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे अर्ज सादर केला.

ॲड्. रमाकांत खलप यांनी काल आपला अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला, तेव्हा त्यांच्यासमवेत गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार व पक्षाचे उत्तर गोवा प्रचार प्रमुख कार्लुस फेरेरा व आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर हे उपस्थित होते.

दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियानो फर्नांडिस यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे काल अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेसनेही शक्तिप्रदर्शन केले. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती.

उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी आपला उमेदवारी अर्ज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, राष्ट्रवादीचे जुझे फिलीप, गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई हे हजर होते.
उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पणजीची ग्रामदेवता असलेल्या श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस नेते व पदाधिकारी, इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्ते हजर होते. खलप यांनी पणजीतील चर्चमध्ये जाऊनही आपल्या विजयासाठी प्रार्थना केली.

दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यापूर्वी काल रामनवमीनिमित्त मडगाव येथील राम मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्याचबरोबर फातोर्डा येथे दामोदर लिंग मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच फातोर्डा येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर चॅपेलमध्ये जाऊन दर्शन घेतले.

उत्तर गोव्यातून लोकसभेवर निवडून आल्यानंतर आपण गोमंतकीयांचे सगळे प्रश्न लोकसभेत मांडणार आहे, असे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ॲड्. रमाकांत खलप यांनी काल सांगितले. आपण गोमंतकीयांचा बुलंद आवाज बनून लोकसभेत जाणार आहे. तेथे गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीसह अन्य सर्व महत्वाचे प्रश्न मांडणार आहे. श्रीपाद नाईक यांना लोकसभेत गोमंतकीयांचे प्रश्न मांडण्यात सतत अपयश आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

25 वर्षानंतर पुन्हा एकदा अपणाला काँग्रेस पक्षाने व गोव्यातील जनतेने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यासाठी आपण सर्वांच्या आभारी आहे. देशासाठी काम करण्याची आपली इच्छा आहे. भारताची राज्यघटना ही अबाधित रहायला हवी; कारण राज्यघटनेनेच देशातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असल्याचे खलप म्हणाले.

शेतकरी, मच्छिमार, मोटरसायकल पायलट, रिक्षा व टॅक्सीचालक आणि तरुण ही आपली शक्ती आहे. त्यांच्या उत्कर्षासाठी झटणे ही पहिले काम आहे. घटक पक्षातील नेते हे पाच पांडव आहेत, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. भाजप सरकार खोटी आश्वासने देऊन लोकांना फसवत आहे. रेल्वे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक, तमनार प्रकल्प, खाण उद्योग, म्हादई नदी असे अनेक प्रश्न गोव्याला भेडसावत आहेत. हे सर्व प्रश्न खासदार म्हणून निवडून आल्यावर संसदेत मांडणार आहे, असेही फर्नांडिस यांनी
सांगितले.