काट्याने काटा

0
20

भारतीय गुप्तचर संस्था देशाच्या शत्रूंचा विदेशी भूमीवर काटा काढत सुटली आहे, असा दावा ‘द गार्डियन’ या नावाजलेल्या ब्रिटीश वृत्तपत्राने नुकताच केला आहे. पाकिस्तानात 2020 पासून जे 20 दहशतवादी ठार मारले गेले, त्या सर्व हत्यांमागे भारत होता असे गार्डियनचे म्हणणे आहे. अर्थात, हा आरोप काही नवा नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी हाच आरोप खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात व्हँकूव्हरमध्ये हत्या झाली, त्यानंतर भारतावर केला होता. पाकिस्तानात भारताचे कित्येक शत्रू गेल्या दोन वर्षांत गूढरीत्या मारले गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी किमान दोनवेळा अग्रलेखातून त्या सर्व हत्यांचा परामर्ष आम्ही घेतला होता. ‘द गार्डियन’ यावेळी आपल्या वृत्तात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांचा हवाला देताना दिसतो. भारताच्या ‘रॉ’ने संयुक्त अरब अमिरातीतील आपल्या एजंटांमार्फत पाकिस्तानात ह्या हत्या घडवल्या आणि त्यासाठी इस्लामिक स्टेट तसेच तालिबानकडून समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या जिहादींच्या भरतीच्या धर्तीवर गरीब पाकिस्तानी तरुणांची भरती केली गेली आणि त्यांना लक्षावधी रुपये देऊन त्यांच्याकरवी भारताच्या शत्रूंना गोळ्या घालून ठार मारायला लावले, त्यासाठी नेपाळ, मॉरिशस व मालदीवमध्ये बैठका झाल्या, असे ह्या बातमीत म्हटले आहे. मात्र, ह्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ कोणताही ठोस पुरावा ‘गार्डियन’ देऊ शकलेला नाही. केवळ पाकिस्तान्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हा सुतावरून स्वर्ग गार्डियनने गाठलेला दिसतो. अर्थात, 2020 पासून पाकिस्तानात भारताचे अनेक शत्रू गूढरीत्या गोळ्या घालून ठार मारले गेले ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व मसूद अजहरचा साथीदार जैश कमांडर शाहीद लतीफ आणि त्याच्या भावाची सियालकोटमधील मशिदीत जवळून गोळ्या झाडून हत्या झाली. त्या प्रकरणात ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये काम करणारा 20 वर्षीय अल्पशिक्षित पाकिस्तानी तरूणच पकडला गेला, ज्याच्या खात्यात दुबईहून दीड दशलक्ष पाकिस्तानी रुपये भरले गेले होते. त्याच्या आधल्या आठवड्यात मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा साथीदार मुफ्ती कैसर फारूख याची कराचीत अज्ञात हल्लेखोराने अशाच प्रकारे हत्या केली होती. राजौरी हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर ए तय्यबाचा रियाझ अहमद ऊर्फ अबू काश्मिरीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये कंठस्नान घातले गेले, त्याची हत्या 20 वर्षीय पाकिस्तानी तरूणानेच केल्याचे नंतर स्पष्ट झाले, ज्याची समाजमाध्यमावरून त्या कामासाठी भरती झाली होती. नाझियाबादमध्ये दहशतवादी कारी खुर्रम शेहजाद मारला गेला, कराचीत मौलाना झियाउर रेहमान अल्ला का प्यारा झाला, अल बद्र मुजाहिद्दीनचा हस्तक सय्यद खालीद रजा, कंदाहार अपरहणकांडाचा सूत्रधार मिस्त्री झहूर इब्राहिम, कुख्यात दहशतवादी सय्यद सलाहुद्दिनचा साथीदार व हिज्बुलचा कमांडर बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम, खैबर पख्तुनख्वामध्ये हत्या झालेला सय्यद नूर शालोबार, अफगाणिस्तानात मारला गेलेला हिंद खुरासानचा म्होरक्या इजाज अहमद अहांगार, अशी ही मारले गेलेल्यांची मोठी यादी आहे. जमात उद दावाचा सूत्रधार हाफीज सईदलाही कारबॉम्बद्वारे ठार मारण्याचा लाहोरजवळच्या जौहर गावातील घराजवळ झाला होता. एकीकडे इस्लामी दहशतवाद्यांचा असा खात्मा चाललेला असताना दुसरीकडे खलिस्तानवाद्यांचीही खैर राहिलेली नाही. खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजितसिंग पंजवारची पाकिस्तानात हत्या झाली. पंजवारची हत्या बद्री 313 बटालियन ह्या इस्लामी दहशतवादी गटानेच केल्याचे स्पष्ट झाले. कॅनडात निज्जर मारला गेला तशाच प्रकारे गुरुपतवंतसिंग पन्नूनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. हे सगळे भारत घडवून आणत असल्याचे गार्डियन म्हणत असला, तरी अद्याप तरी तसे ठोस पुरावे कोणीही देऊ शकलेले नाही. वर नमूद केलेल्या हत्यांपैकी काहींचे हल्लेखोर पकडले गेले, त्यांच्याशी लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचेही आढळून आले, पण त्याचे धागेदोरे भारताशी जोडणे पाकिस्तानलाही शक्य झालेले नाही. मुळात पहिला प्रश्न येथे उभा राहतो तो म्हणजे एवढे सगळे दहशतवादी पाकिस्तानात आश्रयाला कसे? भारताकडे बोट दाखवण्याआधी पाकिस्तानला ह्याचे उत्तर आधी द्यावे लागेल. दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजतकच्या ‘मंथन’ कार्यक्रमात ‘काट्याने काटा’काढण्याची गरज व्यक्त केली होती, तेव्हा मोठा गहजब झाला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात खरोखरीच हा ‘काट्याने काटा’ काढला गेला असेल तर शेवटी त्यातून भारताच्या शत्रूंचाच खात्मा झाला आहे! मग त्या हत्यांमागे कोणीही का असेना!