>> म्हादई प्रवाह प्राधिकरणाचे गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राला पत्र
म्हादई प्रवाह प्राधिकरणाने म्हादई नदीच्या संयुक्त पाहणीसाठी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना पत्र पाठवून संयुक्त पाहणीसाठी संभाव्य तारखा देण्याची सूचना केली आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल दिली.
कर्नाटककडून म्हादईचे पाणी वळविण्यासाठी खोदकाम करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. म्हादईवर सुरू केलेल्या कामाबाबत प्राधिकरणाकडे तक्रार करून संयुक्त पाहणीची मागणी करण्यात येणार असल्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी जाहीर केले होते. राज्य सरकारने प्रवाहकडे म्हादईवरील कामाबाबतचा विषय मांडल्यानंतर प्रवाहने गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांना पत्र पाठवून संयुक्त पाहणीसाठी संभाव्य तारखा देण्याची सूचना केली आहे. प्राधिकरणाकडून संयुक्त पाहणीसाठी तारीख निश्चित केली जाणार आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.