अरविंद केजरीवालांचा मुक्काम तूर्त कोठडीतच

0
14

>> अटक – कोठडी आव्हान प्रकरणी कोणताही दिलासा नाही

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून काल कोणताही दिलासा मिळाला नाही. केजरीवाल यांनी अटक आणि कोठडीच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात न्यायालयाने ईडीला 2 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यात सांगितले असून, पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे.
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला रात्री अटक करण्यात आली होती. मागच्या वर्षी नोव्हेंबरपासून ईडीकडून केजरीवाल यांना 9 वेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते; मात्र त्यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नव्हते किंवा चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यानंतर अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली
होती.

अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेच्या आणि कोठडीच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयात केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी आणि ईडीच्या वतीने एएसजी एस. व्ही. राजू यांनी सुमारे दीड तास युक्तिवाद केला.

आम्हाला सविस्तर उत्तर दाखल करायचे आहे. मुख्य प्रकरणात आम्हाला 3 आठवडे देण्यात आले होते. या प्रकरणात देखील आम्हाला आमचे उत्तर दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे, असे एस. व्ही. राजू म्हणाले.
वेळ मागून घेणे हे विलंबाचे डावपेच आहेत. यावर आताच निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही न्यायालयाला करत आहोत. तुम्ही ही मागणी मान्य करा किंवा नकार द्या, असे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता या प्रकरणी निर्णय दिला. त्यात केजरीवाल यांना अटक आणि कोठडीतून दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली असून 2 एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे. या प्रकरणी आता 3 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

आज कोठडीसाठी पुन्हा हजर करणार
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्याची मुदत गुरुवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करून ईडी कोठडीत वाढ मिळावी, यासाठी विनंती केली जाणार आहे.

आणखी एका ठिकाणी छापा
दुसरीकडे, सुनावणीपूर्वी ईडीने आपचे गोवा-महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला. मद्य धोरणातून मिळालेला पैसा गोवा निवडणुकीत वापरल्याचा दावा ईडीने केला आहे. त्या अनुषंगाने या छापेमारीकडे पाहिले जात आहे.