‘आप’च्या गोवा प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्षांची आज ईडी चौकशी

0
4

>> मद्य धोरण घोटाळा प्रकरण : भंडारी समाजाच्या 2 नेत्यांनाही समन्स

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसेच भंडारी समाजाच्या दोन नेत्यांना काल समन्स बजावल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, उपाध्यक्ष रामराव वाघ यांच्यासह भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक व दत्तप्रसाद नाईक अशा चौघांना ईडीने समन्स बजावले आहेत. ईडीने या चौघांनाही आज (गुरुवार, दि. 28) सकाळी 11 वाजता पाटो-पणजी येथील आपल्या कार्यालयात जबानीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. समन्स बजावण्यात आलेल्या व्यक्तींपैकी चौघेही हे भंडारी समाजातील आहेत. या चारही जणांना पीएमएलए कायद्याखाली समन्स बजावले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक झाली आहे. मद्य धोरणासाठी दक्षिण गटाकडून (साऊथ ग्रुप) लाचेच्या स्वरूपात मिळालेला पैसा हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून गोव्यातील निवडणुकीसाठी पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या रकमेपैकी सुमारे 45 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा वापर 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने निवडणूक प्रचारात केल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने ॲड. अमित पालेकर, रामराव वाघ यांची ईडीकडून गुरुवारी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच गोवा विधानसभा निवडणुकीत आपने मुख्यमंत्रिपदासाठी भंडारी समाजाचा नेता म्हणून अमित पालेकर यांना पुढे केले होते. या पार्श्वभूमीवर भंडारी समाजाच्या दोन नेत्यांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे.

आपचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश तेलेकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपने ‘इंडिया’ आघाडीशी हातमिळवणी केल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून, पराभवाच्या भीतीने भाजप आता आपच्या नेत्यांना अटक करत आहे. केजरीवाल यांनी वेळोवेळी मोदींविरोधात प्रखरपणे लढा दिलेला आहे. आणि म्हणूनच कथित मद्य धोरण घोटाळ्यातील एकही पैसा वसूल करणे शक्य झालेले नसतानाही ईडीचा वापर करून मोदींनी केजरीवाल यांना तुरुंगात डांबल्याचे तेलेकर म्हणाले.

वाल्मिकी नाईक यांनी सांगितले समन्स मागील कारण
गोव्यातील आपचे एक नेते वाल्मिकी नाईक यांनी आपच्या नेत्यांना समन्स बजावण्यामागील नेमके कारण स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्यावेळी झालेल्या सुनावणीत ईडी केजरीवाल यांच्याविरुद्ध त्यांच्याकडे काय पुरावे आहेत हे सादर करू शकली नाही. तसेच पुरावे सादर करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे 3 आठवड्यांचा वेळ मागितला होता; मात्र न्यायालयाने त्यांना केवळ एका आठवड्याचा अवधी दिला आहे. त्यामुळे ईडीने आता गोव्यातील नेत्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले असावे, असे नाईक म्हणाले. न्यायालयाकडून अधिक वेळ मागून घेण्यासाठीचे हे नाटक असावे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.