योगसाधना- 640, अंतरंगयोग- 226
- डॉ. सीताकांत घाणेकर
मानव थोडा वेगळा आहे. चांगले सुखदायक प्रसंग आले, जीवनात यश मिळाले तर तो त्याचे श्रेय स्वतःकडे घेतो. अवश्य त्याचे श्रम, कष्ट असतात; पण ईश्वरी कृपादेखील वरदहस्त त्याच्यावर असतो. म्हणूनच शास्त्रशुद्ध अभ्यास करायला हवा.
विश्वातील प्रत्येक जीवाच्या आयुष्यात विविध प्रसंग येतच असतात- काही सुखकारक तर काही दुःखदायक. थोडे साधे, किरकोळ स्वरूपाचे तर काही आव्हानात्मक. मग तो पशू असो, पक्षी असो, अन्य प्राणी, जीवजंतू, कृमीकिटक अथवा स्वतःला महाबलवान समजणारा मानव असो. मानवाला अत्यंत प्रभावी बुद्धी लाभली आहे. ती तर सर्वशक्तिमान भगवंताची देणगी आहे. त्यामुळे मानव वाईट प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी विविध उपाय करू शकतो व करतोदेखील. मात्र इतर जीवांकडे तेवढी बुद्धी नसते. देवाने दिलेली थोडी अक्कल जरूर असते. त्यामुळे तेदेखील आपल्यापरीने व भगवंताच्या मदतीने स्वतःच्या समस्यांना सामोरे जातात व जमेल तसा उपाय करतात. ते मुके असल्याने आम्हाला ते कळत नाही.
यासंदर्भात मानव वेगळा आहे. चांगले सुखदायक प्रसंग आले, जीवनात यश मिळाले तर तो त्याचे श्रेय स्वतःकडे घेतो. अवश्य त्याचे श्रम, कष्ट असतात; पण ईश्वरी कृपादेखील असते. काहीजण भगवंताची आठवण करतात. त्याची कृतज्ञता विविध तऱ्हेने व्यक्त करतात. कारण शेवटी मानव म्हणजेच कृतज्ञता.
विश्वाकडे नजर फिरवली तर अशा काही व्यक्ती दृष्टिक्षेपात येतात की त्या ईश्वर मानत नाहीत अथवा श्रेय त्याला देण्याची त्यांच्याकडे सद्बुद्धी नसते. वेळ सदा सर्वकाळ सारखीच नसते. अचानक काही समस्या येतात- विविध क्षेत्रांतील. त्यात काही नैसर्गिक असतात- भूकंप, अतिवृष्टी, पूर, रोग- एचआयव्ही, कोरोनासारखे. त्यावेळी या तथाकथित शूरवीरांना स्वतःच्या असमर्थतेची जाणीव होते. ते हतबल होतात. विविध उपाय करतात. ज्योतिषाकडे जातात, भगवंताला गाऱ्हाणे घालतात, कौलप्रसाद घेतात, संत-महापुरुषांकडे जाऊन त्यांचे सल्ले व आशीर्वाद घेतात… त्याशिवाय असे काही लोक आहेत ज्यांना विविध रोग जडतात- शरीरातील विविध संस्थांचे. काहींना नैराश्य येते. जीवनाला कंटाळून ते आत्महत्यादेखील करतात. अशा व्यक्ती थोड्या असल्या तरी कुटुंब व आप्तेष्टांना अशा घटनांचा फार त्रास होतो.
काही शारीरिक व मानसिक समस्यांवर आपण वैद्यकीय उपचार करतो. त्यामुळे आरोग्य थोडे स्थिरावते. पण काही रोगांना व समस्यांना योग्य उपाय सापडत नाही. अशावेळी हतबल व्यक्ती ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक यांच्याकडे जातात, तर इतर संत-महापुरुषांकडून सल्ला घेतात. बहुतेकजण या सर्व उपायांबरोबर भगवंताला शरण अवश्य जातात.
या घटना काही आजच्या युगातीलच नाहीत, तर दर युगातील आहेत. अशावेळी एक उत्तम उपाय म्हणजे अध्यात्माकडे वळणे. तेसुद्धा शास्त्रशुद्ध. नाहीतर विविध प्रतिक्रिया असतात-
- कुणाची तरी वाईट नजर लागली.
- शत्रुपक्षाने तांत्रिकाकडून करणी केली.
- आपण भगवंताचे एवढे कर्मकांड करतो- पूजाअर्चा, अनेक विधी. पण देवदेखील साथ देत नाही. त्यावेळी काहीजण त्यालाच दोष देतात. विपरित ज्ञानामुळे आपली अपेक्षा असते की आपण भगवंताच्या मंदिरात अथवा इतर ठिकाणी एवढी व्रतवैकल्ये करतो मग भगवंताने आपल्याला तसा योग्य प्रतिसाद द्यायला हवा.
यासाठीच अध्यात्मशास्त्र, कर्मसिद्धांत, विविध योगमार्ग- ज्ञान, कर्म, भक्ती, राज (अष्टांगयोग) यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, चिंतन व अनुसंधान हवे. फक्त विशिष्ट अपेक्षेने स्वार्थापोटी केलेली कर्मकांडे, योगासने, प्राणायाम, ध्यान वगैरेचा योग्य परिणाम दिसणार नाही. कर्मसिद्धांताबद्दल थोडी माहिती बहुतेकांना असते, पण सखोल अभ्यास नसतो.
‘कर्माप्रमाणे फळ’, ‘कराल तसे भराल’, ‘पेरणार तसे उगवणार’ या उक्ती तोंडपाठ करून प्रारब्ध बदलत नसते, त्याप्रमाणे कर्म आवश्यक असते हे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला माहीत हवे.
असा विचार आपण का करतो याची काही कारणेदेखील आहेत. अनेकवेळा आपण बालपणात वृद्धांकडून ऐकतो- ‘भगवंताच्या मर्जीशिवाय जगात एक पानदेखील हलत नाही. विश्वातील सर्व घटना देवाच्या इच्छेप्रमाणेच घडतात.’
काही अंशी ही वाक्ये सत्य असतील; पण घटना घडतात त्या प्रत्येक व्यक्तीच्या अनेक पूर्वजन्मीच्या व वर्तमान जन्माच्या कर्माप्रमाणे. म्हणून कर्मसिद्धांतातील मुख्य घटक- क्रियमाण, संचित व प्रारब्ध यांचा अभ्यास हवा. त्यावर चिंतन व चर्चा हवी. यासंदर्भात बालपणात ऐकलेली एक कथा आठवते-
एका गावात एक लहान मुलगा होता. दुर्दैवाने त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच देवाघरी गेले. पोटाची उपासमार होऊ नये म्हणून तो एका चहाच्या हॉटेलात कामाला राहिला. हॉटेल मालकाने त्याचा फायदा घेतला. कारण तो अनाथ होता. काहीवेळा तो त्याला मारहाणदेखील करायचा. मुलगा देवभक्त होता. आईने शिकवल्याप्रमाणे थोडेफार कर्मकांडदेखील करत असे. काही दिवस- महिने- वर्षे लोटली. तो मोठा झाला. त्याने स्वतःचे चहाचे हॉटेल सुरू केले. काही दिवसांनी त्याचे लग्नही झाले. सगळे सुरळीत चालू होते. पण एक दिवस त्याच्या हॉटेलमध्ये काही गुंड प्रवृत्तीची माणसे आली. त्यांनी व्यवस्थित चहा वगैरे घेतला. पण पैसे द्यायला तयार होईनात. त्याने विचारले म्हणून त्यालाच त्यांनी मारहाण केली. त्याला दुखापत झाली.
तो घरी गेला. त्याची पत्नी फार भांडखोर होती. सहानुभूती दाखवण्याऐवजी तिने त्यालाच बोल लावले. थोडेसे जेवून तो झोपी गेला. त्याचे शेवटचे विचार त्याच्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटना हे होते. अज्ञानामुळे तो भगवंताला दोष द्यायला लागला.
मध्यरात्री त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात देव त्याला उठवत होता. तो जागा झाला. देवाने त्याला सांगितले की तुझ्या जीवनात जे वाईट घडत आहे ते तुझ्या पूर्वकर्माप्रमाणे आहे. तू माझ्याबरोबर चल. मी तुला तुझ्या पूर्वजन्मीच्या घटना दाखवतो. मग तुला कळेल की तुझ्या वर्तमान जीवनात अशा दुर्घटना का घडताहेत!
ते एका राज्यात गेले. त्यांनी सरळ राजवाड्याकडे प्रस्थान केले. देवाने भक्ताला सांगितले की आता एक-एक घटना बघ. कारण मागच्या जन्मात तू येथील राजा होतास.
- तू राजा असताना तुझ्या आईवडिलांना कंसाप्रमाणे तू तुरुंगात टाकलेस. त्यांचा छळ केलास म्हणून या जन्मात तुला पालकांचे सुख मिळाले नाही.
- त्याचवेळी तुझ्या मोठ्या भावाला फसवून तू राजा झालास. त्याला त्रास केलेस. त्याला चाबकाने फोडलेस. या जन्मात तो हॉटेल मालक झाला आहे. तुझा त्याने फायदा घेतला. तुला मारले.
- एका व्यापाऱ्याला तू लुटलेस. त्याने कंटाळून आत्महत्या केली. या जन्मात तुझी पत्नी बनून ती तुझा सूड घेते आहे.
- ते दोघं मग कारागृहाच्या ठिकाणी गेले. तिथे काही शेतकरी होते. त्यांनी शेतसारा भरला नाही म्हणून त्यांना तू कैदेत टाकून सैनिकांकडून फटके मारवलेस. त्यांनी गुंड बनून तुझ्या हॉटेलची नासधूस केली.
आता सांग- त्या राजाला या जन्मात काय भोग मिळेल? तुझ्या जीवनात जे काही घडते ते तुझेच संचित आहे. म्हणून तुझे हे प्रारब्ध! मला दोष देऊ नकोस.
भक्ताला ते पटले. भगवंताची त्याने क्षमा मागितली. भगवंताने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले- - मी सर्व आत्म्यांचा मातापिता आहे. मग मी कसे कुणाचे प्रारब्ध वाईट लिहिणार?
- या जन्मात तू तुझ्या सत्कर्मावर लक्ष ठेव. तुझे पुढील जन्म चांगले सुखासमाधानाचे हतील.
- गोरगरिबांना मदत कर. अन्नदान कर. मुक्या जनावरांना सांभाळ. पक्ष्यांना चारापाणी दे.
- ज्यांनी तुला वाईट केले त्यांना मोठ्या मनाने, हृदयापासून अंतर्मनाने क्षमा कर. पण त्याआधी त्यांची माफी माग- दोन तऱ्हेने- परस्पर भेटून व त्यांच्या आत्म्यांना डोळ्यांसमोर ठेवून.
मागच्या जन्मात तू काही सत्कर्म केली आहेत म्हणून त्याचे फळदेखील तुला मिळाले. तुझे स्वतःचे घर, हॉटेल, पत्नी तसेच या जन्मातदेखील थोडे चांगले केले आहेस. तुझे कल्याण होवो. कृतीपासून बोध घ्यायचा असतो. आपले जीवन सुधारायचे असते. कर्माची गती गहन असते.