>> भस्म आरतीवेळी गुलाल उधळल्याने भडकली आग; 9 गंभीर जखमींना इंदूरला हलवले
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे 5.49 वाजता भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग लागली. त्यात पुजाऱ्यासह 14 जण होरपळले. जखमींपैकी 9 जणांना इंदूरला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच उज्जैन जिल्हा रुग्णालयातून 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 2 जणांवर उपचार सुरू आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक स्थान आहे. काल सकाळी भस्म आरती सुरू असताना या ठिकाणी अचानक आग लागली. या घटनेत पुजाऱ्यासह 14 भाविकांना आगीच्या ज्वाळांमुळे होरपळले. आरतीच्या वेळी गुलाल उधळत असताना ही घटना घडली. काल धुळवड असल्याने मंदिरात गुलाल उधळण्यात येत होता. कुणीतरी पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. त्यावेळी त्यांच्या हातात आरती होती. गुलालातील रसायन आगीत मिसळले गेल्याने आग भडकली असावी, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे.
जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन पी. एन. वर्मा यांनी सांगितले की, 14 जखमींपैकी 9 जणांना इंदूरला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 3 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 जणांवर उपचार सुरू आहेत. इंदूरला ज्यांना पाठवले आहे, ते 20 ते 25 टक्के भाजले होते.
उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की, या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.