अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

0
14

>> कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दोन तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाने कालच केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली. मागच्या वर्षी नोव्हेंबरपासून आतापर्यंत ईडीकडून केजरीवाल यांना 9 वेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते; मात्र त्यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नव्हते किंवा चौकशीसाठी हजर झाले नव्हते. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व राज्यसभा खासदार संजय सिंह हे आधीपासूनच अटकेत आहेत.

काल दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटकेच्या कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचे पथक त्यांच्या शासकीय निवासस्थानी चौकशीसाठी हजर झाले. 10 व्या समन्स आणि सर्च वॉरंटसह ईडीचे पथक गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. त्यांच्या घराची यावेळी झाडाझडती घेण्यात आली. तसेच त्यांचा मोबाईल फोन देखील ताब्यात घेण्यात आला. 2 तास चौकशी केल्यानंतर रात्री 9 वाजता ईडीने त्यांना अटक केली. अटकेनंतर केजरीवाल यांना प्रथम ईडीच्या मुख्यालयात नेण्यात नेण्यात आले. तेथेच आरएमएल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय चाचणी केली. यावेळी ईडीच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. कार्यालयाभोवती निमलष्करी दलाच्या 4 कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच दिल्ली पोलिसांचे 100 हून अधिक कर्मचारीही तैनात होते. केजरीवाल यांच्या ईडी कोठडीसाठी शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

तत्पूर्वी, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले. मात्र दिल्ली पोलिसांनी निवासस्थानाचा ताबा घेतला. तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी निवासस्थानाबाहेर आपचे दिल्लीतील आमदार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि ईडीविरुद्ध यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता.

तुरुंगातूनच चालवणार सरकार
ईडीकडून अटक झाली असली, तरी अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार, असे दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी सांगितले.

न्यायालयाच्या निर्णयाने धक्का

या प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा देण्यास काल नकार दिला. यासह न्यायालयाने ईडीला केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नव्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच या प्रकरणावर पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होईल असे सांगितले.

दिल्ली मद्य धोरण नेमके काय?
मद्य विक्री धोरणातील माफियाराज, भ्रष्टाचार संपावा हा विचार समोर ठेवून केजरीवाल सरकारने दिल्लीत मार्च 2021 मध्ये नवे मद्य विक्री धोरण लागू केले होते. यालाच उत्पादन शुल्क धोरण 2021-2022 असे नाव देण्यात आले. या धोरणांतर्गत दिल्ली सरकार मद्यविक्री व्यवसायातून बाहेर पडले आणि मद्याची सर्व दुकाने खासगी लोकांच्या व्यक्तींच्या हातात गेली. याच मद्यविक्री धोरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा भाजपाने केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. याच प्रकरणी मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती.

ईडीने कधी पाठवले समन्स
2 नोव्हेंबर 2023
22 डिसेंबर 2023
3 जानेवारी 2024
17 जानेवारी 2024
2 फेब्रुवारी 2024
22 फेब्रुवारी 2024
26 फेब्रुवारी 2024
27 फेब्रुवारी 2024
17 मार्च 2024