उमेदवार घोषणेसाठी भाजप, काँग्रेसकडून ‘तारीख पे तारीख’

0
14

राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेस पक्षाने उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप केलेली नाही. दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी आपापले उमेदवार दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे शनिवारी सांगितले होते; मात्र सोमवारचा दिवस मावळला तरी उमेदवार जाहीर झाले नव्हते. काल पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी पुढील दोन-तीन दिवसांत उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले.

नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय समितीच्या सोमवारच्या बैठकीत दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावांवर चर्चा झाली; मात्र कोणालाच उमेदवारी जाहीर झाली नाही. दुसऱ्या बाजूला, नवी दिल्ली येथे काँग्रेसने राज्यातील दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी आयोजित बैठक रद्द केली. आगामी दोन दिवसांनंतर काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती अमित पाटकर यांनी दिली.

भाजपच्या गोवा प्रदेश समितीने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी सभांव्य 3 उमेदवारांची नावे केंद्रीय निवडणूक मंडळाकडे पाठविली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीने संभाव्य महिला उमेदवारांचा विचार करून नावे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानंतर भाजपच्या प्रदेश समितीने काही संभाव्य महिला उमेदवारांची नावे पाठविली. भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवारी कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचा दक्षिणेतील उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी प्रयत्न चालविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
भाजपचा दक्षिण गोव्यातील उमेदवार जाहीर झालेला नसला तरी भाजपने कमळ निशाणीच्या माध्यमातून प्रचाराला प्रारंभ केला आहे. काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही.

आशिष सूद गोव्यात दाखल
भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद राज्यात काल दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. निवडणूक व्यवस्थापन आणि आचारसंहिता या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा आता दोन दिवसांनंतर गुरुवारच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
भाजपचा उमेदवार मंगळवार किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे दक्षिण गोव्यासाठी पुरुष की महिला उमेदवार हे दोन्ही पर्याय खुले आहेत. केंद्रीय पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.