उस्ते-नगरगाव, सत्तरी येथे काल दुपारी बाराच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. दीपक राम गावकर (39 वर्षे, रा. उस्ते सत्तरी) असे त्याचे नाव आहे.
सविस्तर माहितीनुसार, दीपक गावकर हा वरचावाडा उस्ते येथून आपल्या दुचाकीने घरी जात होता. उस्ते सत्तरीकडे जाताना भलीमोठी उतरण लागते, त्या उतरणीवर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबाला दुचाकीची धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला वाळपई सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला आहे. वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दीपक गावकर याच्या पश्चात पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे.