लोकशाहीचा महाकुंभ

0
22

लोकशाहीचा महाकुंभ सुरू झाला आहे. देशातील 97 कोटी मतदार येत्या 19 एप्रिल ते 1 जून ह्या काळात एकूण सात टप्प्यांमध्ये एकूण साडे दहा लाख मतदानकेंद्रांवरील 55 लाख इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रांवरून अठराव्या लोकसभेसाठीचा आपापल्या पसंतीचा उमेदवार निवडणार आहेत. जगातील जवळजवळ दोन डझन देशांमध्ये या वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, परंतु त्या सर्वांहून कैक पटींनी मोठा असा हा लोकशाहीचा उत्सव आहे. एक नागरिक म्हणून ह्यामध्ये समरसून सहभाग घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हे मतदान गेली काही वर्षे इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांद्वारे सुरळीतपणे होत असले, तरीदेखील ह्या मतदानयंत्रांच्या नावे शिमगा करण्याचा प्रकार यंदाही झाला. मात्र, निवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी ह्या टीकेचा एका समर्पक ऊर्दू शेरामध्ये चांगलाच समाचार घेतला. अधुरी हसरतोंका इल्जाम हर बार हमपर लगाना ठीक नही । वफा खुदसे नही होती, खता ईव्हीएम की कहते हो? असा त्यांचा रोखठोक सवाल होता. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाची निवडणूकही तब्बल सात टप्प्यांमध्ये होणार आहे. एकूण निवडणूक कार्यक्रम पाहिला तर लक्षात येईल की जवळजवळ बावीस राज्ये आणि संघप्रदेशांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, मणिपूरसारख्या हिंसाचारग्रस्त राज्यामध्ये तेथील मैतेई आणि कुकींमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीमुळे मणिपूरचा अंतर्भाग आणि बाह्यभाग अशा दोन भागांत व दोन टप्प्यांत मतदान घेतले जाणार असल्याने लोकसभेच्या एकूण जागांची संख्या यावेळी 543 ऐवजी 544 दिसते आहे. दक्षिणेतील चारपैकी कर्नाटक सोडल्यास उर्वरित तीन राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र महाराष्ट्रात मात्र तब्बल पाच टप्प्यांत निवडणूक घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील काही जिल्हे, दुसऱ्यामध्ये विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि मराठवाड्याचा काही भाग, तिसऱ्या टप्प्यात उर्वरित मराठवाडा व कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, चौथ्या टप्प्यात पुणे, संभाजीनगर, नंदुरबार वगैरे जिल्हे, तर शेवटच्या पाचव्या टप्प्यात मुंबईसह तेरा जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत यावेळी गेल्यावेळच्या चारऐवजी पाच टप्पे केले गेल्याने विरोधकांनी त्यावर टीकास्र सोडलेले दिसते. लोकसभा निवडणुकीत यंदा सहभाग घेणाऱ्या मतदारांच्या संख्येमध्ये गेल्यावेळच्या तुलनेत सात कोटी मतदारांची वाढ दिसते आहे. विशेष म्हणजे अठरा – एकोणीस वयोगटातील नवमतदारांमध्ये यावेळी एक कोटी 84 लाखांची भर पडलेली आहे. या निवडणुकीचा आणखी एक ठळकपणे जाणवणारा विशेष म्हणजे स्त्रीपुरूष गुणोत्तरात यावेळी मोठा फरक दिसून येतो आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दर एक हजार पुरुषांमागे 928 महिला मतदार असे प्रमाण होते. यावेळी मात्र हे गुणोत्तर दर हजारी 948 वर गेलेले आहे आणि ही स्वागतार्ह बाब आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये महिला उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची जी अहमहमिका लागलेली दिसते त्याचे हेही एक प्रमुख कारण आहे. तृतीयपंथी आणि दिव्यांग मतदारांनाही सन्मानपूर्वक त्यांचा मताधिकार नोंदवण्यासाठी गेली काही वर्षे निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे आणि यावेळी तृतीयपंथीय मतदारांच्या नोंदणीमध्ये मोठी वाढ दिसते आहे. देशात जवळजवळ 48 हजारांवर तृतीयपंथींनी मतदारयादीत नावे नोंदवलेली दिसतात. दिव्यांगांमध्येही मतदानाचा उत्साह आहे. यावेळी 38 लाखांहून अधिक म्हणजे मागील निवडणुकीच्या जवळजवळ दुप्पट दिव्यांगांनी मतदारयादीत नावे नोंदवून घेतलेली दिसतात हे त्यासाठीच्या निवडणूक आयोगाच्या अथक परिश्रमांचे फलित आहे हे नमूद करायला हवे. देशात शंभरी पार केलेले तब्बल 2 लाख 38 हजार मतदार आहेत आणि ऐंशी वर्षांवरील मतदारांची संख्या तर एक कोटी 85 लाखांच्या घरात आहे. ह्या मतदारांना हवे असल्यास घरातून मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. निवडणूक काळामध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांचे यावेळी आगाऊ अर्ज घेण्यात आलेले होते, त्यामुळे निवडणूक काळात जे वयाची 18 वर्षे ओलांडतील त्यांनाही यावेळी आपला पहिलावहिला मताधिकार बजावता येणार आहे. गेल्या काही वर्षांत निवडणुका ही एक कंटाळवाणी प्रक्रिया न राहता तो लोकशाहीचा उत्सव बनावा ह्या दृष्टीने निवडणूक आयोगाने भरपूर प्रयत्न केले. मग ती महिलांसाठी खास सजवलेली मतदान केंद्रे असोत, पर्यावरणपूरक सजावट केलेली केंद्रे असोत, किंवा मतदानदूत किंवा यावेळी इन्फ्ल्युएन्सर्सची केलेली नेमणूक असो. खरोखर हा प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असा लोकशाहीचा उत्सव आहे, त्यामुळेच चुनाव का पर्व, देशका गर्व मानून त्यामध्ये सहभागी होऊया!