बेंदुर्डे-केप्यातील अपघातात दोन ठार

0
6

>> 12 जण जखमी, मालवाहू टेम्पो दरीत कोसळला

>> टेम्पोचालकास अटक

>> जखमींवर गोमेकॉत उपचार

बेंदुर्डे केपे येथे शनिवारी रात्री उशिरा काजू घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा बळी गेला. या अपघातात 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर आधी बाळ्ळी आरोग्य केंद्रात व त्यानंतर दक्षिण जिल्हा इस्पितळात उपचार केले. त्यानंतर त्यांना तर गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यू पावलेले दोघेही फुगे विकण्याचे काम करत होते.

अपघातग्रस्त मिनी टेेंम्पो (एमएच 08 एव्ही 6349) मंगळूर येथून कोल्हापूरला मडगाव दिशेने काजू घेऊन जात होता. बेंदुर्डे केपे या ठिकाणी हा टेम्पो पोहोचल्यानंतर चालकाचा ताबा गेला. टेेंम्पो पुलाच्या कठड्याला धडकून दरीत कोसळला. हा अपघात शनिवारी रात्रेी उशिरा झाला. काजू बियांनी भरलेल्या या टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पोची अरूंद पुलाच्या कठड्याला धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की धडकेने कठडा तुटून ट्रक दरीत कोसळला. त्यावेळी टेम्पोमध्ये पाठीमागे बसलेल्या महिला व पुरूषांवर काजूची पोती पडली व त्याखाली ती चिरडली गेली. ट्रकचालक राकेश गोरे (रत्नागिरी) याने ही माहिती दिली.

या अपघातात हक्कू साठलिया व देवराज साठलिया या सून व सासरा अशा दोघांचा मृत्यू झाला. हक्कू ही देवराजची सून होती. या अपघातात जखमी झालेल्या 11 जणांसह वाहनचालक गोरे अशा एकूण 12 जणांवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी ट्रक कोसळला त्या नदीपात्रात पाणी जास्त नव्हते. या ट्रकमधून एकूण 14 जण प्रवास करत होते.

उपचार सुरू असलेल्यांमध्ये टेम्पोचालक राकेश गोरे, क्लिनर साई चव्हाण व अरविंद, संतोष, राहूल, मुक्ता, किरण, साठलिया तसेच विक्रम, युवराज, राणी विरव, वर्णव या पाच मुलांचा समावेश आहे. त्यांची आई जागीच ठार झाल्याने त्यावर घोर आपत्ता कोसळली आहे.
शनिवारी काणकोणचा आठवड्याचा बाजार होता. त्यानिमित्त फुगे विकणारे हे साठलिया कुटुंब काणकोणला गेले होते. फुगे विकणाऱ्यांमध्ये 6 पुरूष, 3 महिला व 5 लहान मुलांचा समावेश होता. कुंकळ्ळी पोलिसांनी चालक गोरे याला अटक केली. कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियश या प्रकरणी तपास करीत आहेत.

लिफ्ट बेतली जिवावर

मालवाहू वाहनातून प्रवाशांना नेता येत नाही. परंतु साठलिया कुटुंबीय काणकोण येथे फुगे विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी लफ्ट मागितली व टेम्पोचालक गोरे याने त्यांना रात्रीची वेळ असल्यामुळे लिफ्ट देत टेम्पोमध्ये काजू बियांच्या पोत्यांवर बसण्यास सांगून प्रवास सुरू केला. मात्र साठलिया कुटंबाच्या दुर्दैवाने टेम्पोचा अपघात झाला व ट्रक दरी कोसळला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. टेम्पोचालक दारूच्या नशेत होता, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत मदतीला धावले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काणकोण येथे सभा होती. ती सभा आटोपून ते परत येत असता त्यांना हा अपघात झालेला दिसला व त्यांच्यासह यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हेही होती. अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्वरित मुख्यमंत्री व मंत्री फळदेसाई यांच्याबरोबर असलेला ताफा जखमींच्या मदतीला धावला. त्यांच्यासोबत माजी खासदार नरेंद्र सावईकरही उपस्थित होते. जखमींना इस्पितळात नेण्यात आले तोपर्यत मुख्यमंत्री घटनास्थळी उपस्थित होते.