दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारांबद्दल बैठका सुरू आहेत. काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊ शकते ही शक्यता असल्यामुळे उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे. त्यातच भाजपचे आपली पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता यानंतर, भाजपने दुसऱ्या यादीची तयारी सुरू केली आहे. यासाठी आज सोमवारी (दि. 11) सायंकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणातील उर्वरित लोकसभा जागांबाबत चर्चा होईल. त्यानंतर लगेच पक्षाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक गुजरात-महाराष्ट्र आणि तेलंगणामधील लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील भाजप मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपचे प्रमुख सी. आर. पाटील, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह तेलंगणातील भाजप नेत्यांचा समावेश होता.
आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत युती
भाजपने आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि पवन कल्याणच्या जनसेनेशी युती केरुन जागावाटपही पक्के केले आहे. भाजप आंध्रमध्ये लोकसभेच्या 8 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर उर्वरित जागा टीडीपी लढवेल.
पहिल्या यादीत 195 उमेदवार
195 उमेदवार जाहीर यापूर्वी 2 मार्च रोजी भाजपने 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 34 मंत्र्यांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेश (51), पश्चिम बंगाल (20), मध्य प्रदेश (24), गुजरात (15), राजस्थान (15), केरळ (12), तेलंगणा (9), आसाम (11), झारखंड (11), छत्तीसगड (11), दिल्ली (8), जम्मू-काश्मीर (5), उत्तराखंड (3), अरुणाचलप्रदेश (2) गोवा (1), त्रिपुरा (1), अंदमान (1), दमण आणि दीव (1) येथील उमेदवारांचा समावेश आहे.